fbpx
Tuesday, September 26, 2023
Latest NewsPUNE

एआरएआयच्या वतीने ‘ऑटोमोटिव्ह मटेरियल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग’ विषयावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पुणे : ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय)च्या वतीने येत्या बुधवार दि. ३१ मे ते शुक्रवार दि. २ जून, २०२३ दरम्यान चाकण येथील होमोलोगेशन टेक्नॉलॉजी सेंटर अर्थात एआरएआय-एचटीसी येथे ‘ऑटोमोटिव्ह मटेरियल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग’ (एएम अँड एम २०२३) या विषयावर चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एआरएआयचे संचालक डॉ रेजी मथाई यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

कोविड काळात ऑनलाईन पद्धतीने संपन्न झालेल्या तिसऱ्या परिषदेनंतर यावर्षीची परिषद ही एआरएआय – चाकण येथे प्रत्यक्ष स्वरुपात संपन्न होणार आहे. एसएई इंडिया आणि एएसएम इंटरनॅशनल, पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक नितीन धांडे, एआरएआयच्या वरिष्ठ उपसंचालिका व परिषदेच्या समन्वयक  मेधा जांभळे आदी मान्यवर या वेळी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

या संदर्भात अधिक माहिती देताना डॉ. रेजी मथाई म्हणाले, “शेपिंग प्रोग्रेसिव्ह मोबिलिटी थ्रू इमर्जिंग मटेरिअल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी ही या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेची संकल्पना असून सध्या वाहन उद्योग क्षेत्र हे इंधनाच्या कार्यक्षमतेतील सुधारणा, वजनाने हलकी वाहनांची संरचना, आवश्यक सुरक्षितता, पर्यावरणावरील परिणाम, उत्पादन विकास चक्रात होणारी घट, ई-मोबिलिटी सारखे मोबिलिटी सोल्यूशन यांसाठी प्रयत्नशील आहे. आज काळाची गरज असलेल्या आत्मनिर्भरतेच्या अर्थात स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाकत असताना मटेरिअल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग हे दोन्ही घटक वाहन व्यवसायासातही महत्त्वाचे आहेत. हेच लक्षात घेत एआरएआयच्या माध्यमातून आम्ही मटेरियल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी या विशेष आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. याद्वारे या क्षेत्रातील प्रमुख आणि तंत्रज्ञ एकत्र येत एकाच व्यासपिठावर नाविन्यपूर्ण संकल्पना, तंत्रज्ञान, उपाय, आव्हाने इत्यादींवर चर्चा करतील.”

याशिवाय परिषदेत अॅडव्हान्स मटेरियल, प्लॅस्टिक व कंपोझिट, उत्पादन प्रक्रिया, अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, ई-मोबिलिटी, डिझाईन व सिम्युलेशन, एआय व एमएल यांसारख्या विविध विषयांची अलीकडील काळात झालेली प्रगती यावर देखील चर्चा करण्यात येईल, असेही डॉ मथाई यांनी नमूद केले.

देशातील वाहन उद्योगाच्या प्रगतीविषयी बोलताना डॉ मथाई म्हणाले, “आज जागतिक स्तरावर भारतीय वाहन उद्योगाने उत्पादन क्षेत्रात पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. उत्पादन क्षेत्रात आता भारताच्या पुढे फक्त अमेरिका आणि चीन हे दोन देश आहेत. दुचाकी व ट्रक्टर निर्मितीत मात्र भारत पहिल्या क्रमांकावर आहे. उत्पादन क्षेत्रात भारताची अशी आगेकूच सुरु असताना वाहन उद्योगासाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या निर्मितीतही भारतीय उद्योगाने चांगली कामगिरी केल्याचे दिसत आहे. त्यामध्ये केंद्र सरकारच्या पीएलआय अर्थात प्रोडक्ट लिंक्ड इन्सेन्टिव्ह या योजनेने चांगला हातभार लावल्याचे निदर्शनास आले आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने शंभरहून अधिक सुट्या भागांचा अंतर्भाव केला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने आयात केल्या  जाणाऱ्या सुट्या भागांना भारतीय बनावटीचा पर्याय देण्यात आला आहे.”

एआरएआयच्या वरिष्ठ उपसंचालिका व परिषदेच्या संयोजिका मेधा जांभळे यावेळी म्हणाल्या, “या आंतरराष्ट्रीय परिषद मध्ये वाहनउद्योग क्षेत्र, संशोधन व विकास संस्था (आर अँड डी), शैक्षणिक क्षेत्र यांमधील २० हून अधिक तज्ज्ञांची बीजभाषणे, चर्चासत्रे यांचा समावेश असणार आहे. याबरोबरच मटेरियल्स आणि मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित १५ तांत्रिक सत्रांत ४० हून अधिक तांत्रिक पेपर्स देखील सादर केले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समूह अध्यक्ष डॉ. अजित सप्रे, इस्त्रोचे शास्त्रज्ञ डॉ एस ए इलानगोवन, डीआरडीओचे डॉ बी प्रवीणकुमार, टाटा मोटर्सचे श्रीपादराज पोंक्षे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रो अलंकार आदी मान्यवर या वेळी उपस्थित असणार आहेत.”

ई-मोबिलिटी मध्ये साहित्य आणि उत्पादने, प्लॅस्टिक आणि कॉम्पोझिट मटेरिअल, इंडस्ट्री ४.०, एआय/ एमएल, सरफेस कोटिंग आणि प्रोसेसिंग, मटेरियल मॉडेलिंग आणि सिम्युलेशन अशा विविध विषयांवर परिषदेत चर्चा होणार असून ‘मटेरियल्स फॉर सस्टेनेबल मोबिलिटी’ या विषयावर होणारे चर्चासत्र हे या परिषदेचे मुख्य आकर्षण असणार असून यामध्ये तज्ज्ञ, सीटीओज्, संशोधक आणि वैज्ञानिक आपले विचार मांडतील असे सांगत मेधा जांभळे पुढे म्हणाल्या, “वाहन उद्योग क्षेत्रातील भविष्यवेधी तंत्रज्ञान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिग डेटा अॅनालिटिक्स इन मटेरियल अँड मॅन्युफॅक्चरिंग’ या विषयावर देखील एका विशेष चर्चासत्राचे आयोजन परिषदेत करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी तज्ज्ञ या तंत्रज्ञानावर त्यांचे अनुभव उपस्थितांसमोर मांडतील. एआरएआय चाकण येथे परिषदेच्या ठिकाणी एक प्रदर्शन देखील आम्ही आयोजित केले असून या ठिकाणी वाहन उद्योग क्षेत्र, तंत्रज्ञान आणि विकास यांच्याशी संबंधित २५ स्टॉल्स देखील असणार आहेत.”

मटेरियल अँड मॅन्युफॅक्चरिंग या विषयाशी निगडीत एआरएआय करीत असलेल्या कामांसंबंधी अधिक माहिती देताना डॉ रेजी मथाई म्हणाले, “गेली ५० वर्षांहून अधिक काळ ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) हे वाहन उद्योग क्षेत्राला आवश्यक ती मदत करीत आले असून २०१६ साली चाकण येथे फटिग अँड मटेरियल सेंटर ऑफ एक्सलन्स (एफएमसीई) ची स्थापना देखील करण्यात आली आहे. या ठिकाणी वाहनांसाठीचे कमी वजनाचे पर्यायी साहित्य, मटेरियल कॅरेक्टरायझेशन, मटेरियल मॉडेल कार्ड डेव्हलपमेंट, फोर्जिंग प्रोसेस डेव्हलपमेंट, ड्युरॅबिलिटी इव्हॅल्युएशन, एन्व्हायर्नमेंट व्हॅलिडेशन ऑफ स्पेसिमेन अँड प्रोडक्ट, प्रोडक्ट ऑप्टिमायझेशन आदी बाबींवर काम करण्यात येत आहे.”

एआरएआयच्या फटिग अँड मटेरियल सेंटर ऑफ एक्सलन्स (एफएमसीई) मध्ये तयार होतायेत अॅडव्हान्स मटेरियल मॉडेल कार्डस् –
कोणतेही मटेरिअल वापरताना त्यासाठीचे मटेरीअल मॉडेल कार्ड हे महत्त्वाचे असते. कोणत्याही मटेरिअलचे टेस्टिंग झाल्यानंतर त्याला सिम्युलेशनमध्ये वापरण्यासाठी मटेरिअल प्रॉपर्टीजचा डेटा हा मटेरिअल मॉडेल कार्डमध्ये  ट्रान्सलेट करून मटेरियलच्या गुणधर्माची माहिती ही संगणकाला समजेल अशा भाषेत त्या त्या सॉफ्टवेअर आणि अॅप्लिकेशनला दिली जाते. अशा पद्धतीने यावर संशोधनात्मक काम करणाऱ्या जगात केवळ तीन ते चार संस्था आहेत. सध्या एआरएआय अशा पद्धतीच्या अॅडव्हान्स मटेरियल मॉडेल कार्डस वाहन उद्योग क्षेत्राला उपलब्ध करून देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ३१ मे रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत अशा मटेरिअल कार्ड डेटाबेस निर्मिती प्रकल्पाची औपचारिक घोषणा करण्यात येणार असून नजीकच्या भविष्यात प्लॅस्टिक आणि कॉम्पोझिट मटेरिअलसाठी मटेरिअल मॉडेल कार्डस बनविण्यावर एआरएआयचा भर असणार असल्याचेही मेधा जांभळे यांनी सांगितले.

अंडररन प्रोटेक्शन डिव्हाईसचे एआरएआय कडून संशोधन –
एआरएआयने सहयोगींच्या सहकार्याने अंडर-रन प्रोटेक्शन डिव्हाईस (UPD) विकसित केले आहे, जे अपघात झाल्यास प्रभावीपणे ऊर्जा शोषण्यासाठी वाहनाच्या मागील (RUPD), लॅटरल (LPD) किंवा समोर (FUPD) वापरले जाऊ शकते. अपघातात धडक देणारे व धडक झालेले वाहन या दोन्हीची सुरक्षितता यामुळे सुधारली जाईल. या डिव्हाईसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे धडक बसल्यानंतर ते मूळ आकारात येऊ शकते.

Leave a Reply

%d bloggers like this: