Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

नदी सुधार प्रकल्प सर्वांत घातक : शैलजा देशपांडे


पुणे : नदी विषयक सर्वांत घातक प्रकल्प म्हणजे नदी सुधार योजना आहे. या प्रकल्पाने नदी स्वच्छ होणार नाही तर फक्त नदीकाठांचे सुशोभिकरण होणार आहे. ज्या नदीकाठी आपण वसलेलो आहोत तिच्याबद्दल आपण जाणूनच घेत नाही, अशी परखड टीका पर्यावरणप्रेमी शैलजा देशपांडे यांनी केली. नदी ही शहरातून वाहत नसते तर नदीच्या काठावर शहर वसते. नदीची ओळखच आपण विसरलो आहोत त्याचे कारण नदीचे पाणी आपल्यापर्यंत नळामधून येते. आताच्या काळात पर्यावरणवादी अथवा पर्यावरणप्रेमी हे शब्द माध्यमांमधून एखाद्या शिवीसारखे वापरले जातात. ही मंडळी म्हणजे विकासाच्या आड येणारे असा समज पसरविला जात आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

नदी संवर्धनाविषयी जनजागृती करणाऱ्या पर्यावरणप्रेमी शैलजा देशपांडे यांचा रंगत संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे अभिनेते, लेखक-दिग्दर्शक योगेश सोमण यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर आणि प्रज्ञा महाजन व्यासपीठावर होते.
आपले आरोग्य ज्या पाण्यावर अवलंबून आहे ते कुठून येते, ते पिण्यायोग्य आहे का, त्याची गुणवत्ता काय आहे या विषयीची माहिती महापालिका आपल्याला देते का? जे पाणी आपण वापरतो ते पाणी नंतर कुठे जाते, कसे जाते याचा विचार आपण करतो का? असे प्रश्न उपस्थित करून देशपांडे म्हणाल्या, या गोष्टी आपल्याला कुठल्याही शिक्षण पद्धतीत शिकविल्या-सांगितल्या जात नाहीत. त्यामुळे पाण्याचा जो प्रत्येक थेंब आपण पितो त्याला जागायची आता वेळ आली आहे.
योगेश सोमण म्हणाले, जे रोज मिळते त्याची किंमत नसते अशा पद्धतीने आपण पाणी वाया घालवतो. अविरत पाणी मिळणाऱ्या घटकाला त्याची किंमत समजत नाही. पण ज्या भागात पाण्याची भ्रांत पडते अशा ठिकाणी या पाण्याची किंमत माणसाला कळते. एक कलावंत या नात्याने मी नदीकडे संस्कृतीचा स्रोत म्हणून बघतो. तिच्या उगमापासून संस्कृती-कला सुरू होते. नदी सहजतेने वाहत तिच्या भोवतालाला समृद्ध करत जाते. त्यामुळे शैलजाताईंचे हे कार्य केवळ पाण्यासाठीचे नसून संस्कृतीचा स्रोत-प्रवाह अविरत चालविणेच आहे.
सत्कार सोहळ्यानंतर ‘पाणी’ या विषयावर कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यात जयंत भिडे, भारती पांडे, धनंजय तडवळकर, स्वाती सामक, दयानंद घोटकर, उर्मिला वाणी, विजय सातपुते, संगीता पुराणिक, माधव हुंडेकर, चंचल काळे, प्रभा सोनवणे, स्वप्निल पोरे, मानसी चिटणीस, तनुजा चव्हाण, डॉ. मृणालिनी गायकवाड, सुजित कदम, रुपाली अवचरे, क्षिप्रा शहाणे, निरूपमा महाजन यांनी कविता सादर केल्या.
प्रास्ताविकात रंगत-संगत प्रतिष्ठानच्या कार्याविषयी माहिती देऊन ॲड. प्रमोद आडकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
सूत्रसंचालन आणि सन्मानपत्राचे वाचन शिल्पा देशपांडे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading