fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

संगीतोपचार पद्धतीवर संशोधन आणि अभ्यासक्रम निर्मितीसाठी सामंजस्य करार

पुणे : संगीतातील कंठ संगीत, स्वर वाद्य, ताल वाद्य, सुगम संगीत, लोक संगीत त्यातील स्वर लगाव, आघात, लय, आवाजाची फेक, आवाजाची पातळी, आवाजाची जातकुळी अशा अनेक घटकांचा मानवावर होणारा परिणाम वैद्यक शास्त्राच्या निकषांना धरून तपासण्याची गरज आहे. संगीतोपचार पद्धतीवर संशोधन आणि अभ्यासक्रम निर्मितीसाठी भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् आणि भारती विद्यापीठ आयुर्वेद महाविद्यालयामध्ये सामंजस्य करार झाला आहे. अशी माहिती स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् चे संचालक प्रा.  शारंगधर साठे यांनी दिली.

आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजित पाटील, डॉ. मानसी देशपांडे, परफॉर्मिंग आर्टस् चे संगीत विभाग प्रमुख प्रा. प्रवीण कासलीकर यांच्या उपस्थितीत हा करार झाला.

प्रा.  शारंगधर साठे म्हणाले,  संगीत हि अशी कला आहे ज्याचा परिणाम सृष्टीतील सर्व सजीवांवर होत असल्याचे अनेक वेळा सांगण्यात येते. मनुष्यावर संगीताचा प्रभाव ठळक दिसून येतो. याचा आधार घेत विविध आजारांवर उपचार म्हणून संगीताचा उपयोग करण्याचे प्रयोग चालू झाले आहेत. मात्र या उपचार पद्धतीचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याची गरज आहे आणि म्हणून संगीत क्षेत्रातील तज्ञ तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आज निर्माण झाली आहे.

संगीत विषयाशी संबंधित घटक आणि संगीततज्ञ हा भाग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् सांभाळणार आहे तर वैद्यक शास्त्राशी निगडीत अभ्यास, रुग्ण आणि प्रयोगांसाठी आवश्यक रुग्णालय, प्रयोगशाळा व वैद्यकीय संख्याशास्त्रज्ञ यांची बाजू आयुर्वेद महाविद्यालय सांभाळणार आहे यावर संशोधन करून नंतर या विषयाचा अभ्यासक्रम चालू करता येईल. संशोधनाचा लाभ रुग्णांना तसेच या विषयाचा अभ्यास करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल अशी आशा दोन्ही महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सामंजस्य करारा वेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading