Tuesday, May 5, 2026
BusinessLatest NewsPUNE

‘नेट झिरो’ उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे योगदान महत्त्वपूर्ण

पुणे : देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे योगदान हे तब्बल ३३ टक्के इतके आहे. आज भारतातून होणाऱ्या निर्यातीच्या एकूण ५० टक्के उत्पादन हे याच उद्योगांमधून येते. त्यामुळे नजीकच्या भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘नेट झिरो’ उद्दिष्ट साध्य करायचे असल्यास देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे योगदान हे अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले.

पिंपरी चिंचवड येथील बीएनआय नेटवर्क या संस्थेला ८ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने लेखा फार्म्स या ठिकाणी आयोजित कार्यक्रमावेळी ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे आजच्या काळातील भवितव्य’ या विषयावर आयोजित चर्चात्मक कार्यक्रमात तज्ज्ञांनी ही मते मांडली. यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर अर्थात एमसीसीआयचे अध्यक्ष दीपक करंदीकर, प्राज इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष डॉ रवींद्र उटगीकर, बीएनआयच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील विभागीय संचालक आणि बीएनआयचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मुरली श्रीनिवासन, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ श्रीकांत सारडा, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीचे संचालक डॉ विवेक देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. बीएनआयच्या पिंपरी चिंचवड विभागाचे कार्यकारी संचालक देवानंद देशमुख यांनी यावेळी सर्व तज्ज्ञांशी संवाद साधला.

सदर कार्यक्रमामध्ये बीएनआयच्या पिंपरी चिंचवड विभागाच्या वतीने सभासदांना लीडरशिप टीम्स आणि वैयक्तिक अशा दोन प्रकारांमध्ये त्यांच्या कामगिरीसाठी गौरविण्यात आले. यावेळी प्रमोद गायकवाड यांचा ‘बेस्ट परफॉर्मर ऑफ द इयर’ या पुरस्काराने तर विभाग संचालक सुनंदा नायर यांचा ‘एक्सेप्शनल लीडरशिप इन इमर्जन्सी’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. याबरोबरच फाउंडिंग मेंबर्स म्हणून १० जणांचा विशेष सत्कार देखी यावेळी करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ रवींद्र उटगीकर म्हणाले, “सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे आज देशात रोजगार पुरविणारे महत्त्वाचे क्षेत्र आणि आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. नेट झिरो उद्दिष्टांकडे मार्गक्रमण करीत असताना उर्जा संक्रमण, जंगलतोड, कार्बन कॅप्चर व स्टोरेज यांबरोबर सर्क्युलर इकोनॉमी या गोष्टींकडे देखील आपल्याला लक्ष देणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांना एकत्र घेऊनच पुढे जाणे आपल्याला शक्य होईल.” सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी आपले वेगळेपण सिद्ध केल्याशिवाय मोठ्या कंपन्या त्यांकडे वळणार नाहीत. पर्यावरणीय सामाजिक प्रशासन अर्थात ‘एन्व्हायर्नमेंटल सोशल गव्हर्नन्स’ हा उद्योगांसाठी ईसीजी सारखा आहे असेही डॉ. उटगीकर म्हणाले.

आज सर्व उद्योगांनी आपले दीर्घकालीन ‘सस्टेनेबल’ उद्दिष्ट समोर ठेवत कार्यरत राहणे गरजेचे असल्याचे मत दीपक करंदीकर यांनी व्यक्त केले. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना ओळख मिळावी या दृष्टीने एमसीसीआयए प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बीएनआय सारख्या व्यासपीठावर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना एकत्र आणत त्यांना एक हक्काचे व्यासपीठ देत एकमेकांशी जोडण्याचे काम आम्ही गेली अनेक वर्षे करत असल्याचे मुरली श्रीनिवासन यांनी सांगितले. उद्योग ‘सस्टेनेबल’ करण्याच्या दृष्टीने सुरुवातीला होणारा खर्च हा अवाजवी वाटू शकतो, मात्र नजीकच्या भविष्यात हीच गोष्ट महत्त्वपूर्ण ठरते याकडे श्रीकांत सारडा यांनी लक्ष वेधत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी ‘सस्टेनॅबिलिटी’ महत्त्वाची आहे असे सांगितले. तर डॉ. विवेक देशपांडे यांनी या उद्योगांना ‘सस्टेनेबल’ करण्याच्या दृष्टीने महाविद्यालयीन अभ्यासक्रम महत्त्वाचा भाग ठरतील असे नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading