Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

शिवराज्याभिषेक हा ख-या अर्थाने देशाचा आनंदोत्सव – इतिहास अभ्यासक मोहन शेटे

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यक्तीपेक्षा स्वराज्य आणि स्वपरंपरा याला महत्त्व दिले. स्वराज्याची संकल्पना जनतेत रुजविली. त्यामुळेच त्यांच्या नंतरही कित्येक वर्षे औरंगजेबाशी लढा सुरूच राहिला. स्वराज्य जिंकण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला शेवटपर्यंत छत्रपतींनी उभे केलेले स्वराज्य जिंकता आले नाही. हीच शिवरायांची खरी ताकद होती. त्यांनी मनामनात स्वराज्य निर्माण केले होते. व्यक्तीपेक्षा विचारांना प्राधान्य दिले होते. त्यामुळे त्यांचा राज्याभिषेक खऱ्या अर्थाने देशाचा आनंदोत्सव आहे. म्हणून राज्याभिषेकांचे स्मरण झाले पाहिजे, असे प्रतिपादन इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष व इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी व्यक्त केले.

वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या १४८च्या ज्ञानसत्रात मोहन शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्त्व या विषयावर विचार मांडले. नारायण पेठेतील केसरी वाडयात असलेल्या लोकमान्य सभागृहात ही व्याख्यानमाला सुरु आहे.

मोहन शेटे म्हणाले, छत्रपती शिवरायांनी मावळ्यांच्या सहाय्याने अल्पावधीत स्वराज्य स्थापन केले, ते सिंहासनाच्या उपभोगात रमणारे नव्हे, तर रणांगणांत पराक्रम गाजविणारे राजे होते. मात्र मोगलांना छत्रपतींचे स्वराज्य मान्य नव्हते. छत्रपतींना ते राजा मानायला तयार नव्हते. त्यामुळे शिवरायांना अधिकृत राजाचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी म्हणून राज्याभिषेक आवश्यक होता.

ते पुढे म्हणाले, औरंगजेबाला सर्वत्र सत्ता मिळवून मोगल राज्य बनवायचे होते. मात्र औरंगजेबाचे हे स्वप्न शिवरायांनी पूर्ण होऊ दिले नाही. त्यामुळे मोगल दरबारातील कागदपत्रांत बंडखोर असा शिवरायांचा उल्लेख केला जात होता. अशा परिस्थितीत स्वराज्याला राजमान्यतेची आवश्यकता होती. राज्याभिषेक झाल्यानंतर शिवरायांनी नाणे सुरू केले ,कालगणना सुरु केली. राज्याभिषेक शक सुरू केला मराठी भाषेचा कोश सुरू केला, पत्राचा मायना बदलला, अष्टप्रधान मंडळाची रचना केली. स्वराज्यातील या सर्व गोष्टींना अधिकृतपणा आला. शिवरायांचा राज्याभिषेक म्हणजे जनतेसाठी स्वातंत्र्याच्या सर्वभौमत्वाचा आनंद होता. या राज्याभिषेकामुळे प्रचंड परिवर्तन झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading