पुणेकरांनी घेतली परसबाग फुलविण्याची शपथ
पुणे : शहरात फ्लॅट संस्कृतीमुळे घराला अंगण नाही. अंगण नसल्यामुळे परसबाग नाही. परंतु तरी देखील घराच्या गच्चीत फुलांची, फळांची व फळभाज्यांची सुंदर परसबाग कशी फुलवायची, रासायनिक खतांचा वापर टाळून घरातील भांज्यापासून खत कसे बनवायचे, याचे धडे कार्यशाळेतून घेत पुणेकरांनी घराच्या गच्चीवर परसबाग फुलविण्याची शपथ घेतली. यानिमित्ताने हरित पुणे करण्याचा संकल्प देखील केला.
चौफेर प्रतिष्ठान, ग्रंथ पारायण दिंडी व कसबा गोसेवा समितीच्यावतीने जागतिक वसुंधरा दिनानिमित्त टेरेस गार्डनिंग कार्यशाळेचे शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत आयोजन करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत गो आधारित शेती आयात प्रमुख गिरीधर गोशाळेच्या संचालक पंचगव्य चिकित्सक पूनम राऊत यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले.
यावेळी कसबा भाग संघचालक ऍड प्रशांत यादव, कसबा बाग सहकार्यवाह हेमंत किराड, प. महाराष्ट्र प्रांत गोसेवा सहसंयोजक रवींद्र रबडे, पुणे महानगर गोसेवा संयोजक सुधीर पाचपोर, निरंजन गोळे, ऍड वृंदा जोशी, वीरेंद्र कुंटे, बाळासाहेब मेथे, महेश काळे, संजय जोशी, आशीर्वाद मुळे, राहुल भाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
पूनम राऊत म्हणाल्या, निर्सगाने आपल्याला भरभरून दिले आहे. ते ओळखण्याची आणि जपून ठेवण्याची ताकद आपल्याकडे असली पाहिजे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर कोविड काळात माणसाला आरोग्याची आणि निर्सगाची खरी किंमत समजली. गो शाळेत काम करणाऱ्या, गाईंच्या सानिध्यात काम करणाऱ्या लोकांना कोविड संसर्गाची बाधा झाली नाही आणि ज्यांना झाली त्यांनी त्याचा काही त्रास देखील झाला नाही. त्याकाळात सर्व माणसे घरात होती तेव्हा निर्सग पुन्हा फुलत होता. आता पुन्हा निसर्ग प्रदूषणाच्या विळख्यात अडकत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याची आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
