अनोख्या पद्धतीने साजरा होणार जागतिक अकॉर्डियन दिवस
‘अकॉर्डियन ऑन व्हील’ या कार्यक्रमाअंतर्गत पुणे मेट्रोमध्ये चार कलाकार सादर करणार जुन्या हिंदी गीतांचा विशेष कार्यक्रम
पुणे : ‘अकॉर्डियन ऑन व्हील’ या कार्यक्रमाद्वारे पुणे मेट्रोमध्ये येत्या शनिवार दि ६ मे रोजी अनोख्या पद्धतीने जागतिक अकॉर्डियन दिवस साजरा करण्यात येणार आहे. पुणे मेट्रोच्या ‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ उपक्रमांतर्गत सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून चार नामवंत अकॉर्डियन कलाकार यावेळी जुनी हिंदी गीते उपस्थितांसमोर सादर करतील. सदर कार्यक्रमाला ६ मे रोजी सकाळी ९.३० वाजता कोथरूड येथील वनाझ मेट्रो स्थानकातून सुरुवात होणार असल्याची माहिती अॅकॉर्डियन कलाकार व कार्यक्रमाचे संयोजक हेमंत उर्ध्वरेषे यांनी दिली. कार्यक्रमासाठी कोणतेही वेगळे प्रवेश शुल्क नसून रसिकांना केवळ मेट्रोचे तिकीट काढत या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना हेमंत उर्ध्वरेषे म्हणाले, “मी स्वत: आणि माझे सहकारी कलाकार चंदू काळे व राम आस्वानी मिळून जागतिक अकॉर्डियन दिवस साजरा करण्याच्या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन करीत आहोत. यावेळी आम्ही पुणे मेट्रोच्या प्रवासात जुन्या हिंदी गीतांचे वादन करीत हा दिवस साजरा करणार आहोत. सुप्रसिद्ध अकॉर्डियन कलाकार असलेले अनिल गोडे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार असून ते देखील आमच्यासोबत काही गाणी प्रस्तुत करतील. अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम पुणे मेट्रोमध्ये सादर होत आहे याचा आम्हाला आनंद आहे.”
वनाज मेट्रो स्टेशनमधून मेट्रो निघाल्यानंतर हा कार्यक्रम सुरु होईल. वनाज ते गरवारे मेट्रो स्टेशन आणि पुन्हा गरवारे ते वनाज स्टेशन या प्रवासात कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी समूह व एकल सादरीकरण होणार असून जास्तीत जास्त संगीतप्रेमींनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन हेमंत उर्ध्वरेषे यांनी केली आहे.
