पुणेकर रसिकांनी अनुभविली लोकप्रिय हिंदी – मराठी गाण्यांची सुरेल संध्याकाळ
पुणे : प्रसिद्ध नाट्यकर्मी प्रशांत दामले, ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि गायिका अश्र्विनी वझे यांनी सादर केलेली लोकप्रिय हिंदी-मराठी गीते आणि सोबतीला प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्याशी संवाद साधत उलगडलेले विविध किस्से ऐकत, एक मनोरंजक संध्याकाळ पुणेकर रसिकांनी अनुभविली.
महाराष्ट्र चित्पावन संघाच्या वतीने परशुराम जयंतीचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रशांत दामले, डॉ. गिरीश ओक आणि निवेदक सुधीर गाडगीळ यांना परशुराम पुरस्काराने गौरविण्यात आले. यानंतर हा विशेष हिंदी-मराठी गाणी व किस्से यांचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात प्रशांत दामले, डॉ. गिरीश ओक आणि अश्विनी वझे यांनी कधी एकट्याने तर सहगायन करत, ‘संधीकाली या अशा…’, ‘कधी रे येशील तू’, ‘फुलो के रंग से’, ‘विठूचा गजर’, ‘हरिनामाचा झेंडा रोविला’, ‘मुंबईची लावणी’, ‘मेरा नाम चिन चिन चू..,’ अशी लोकप्रिय गाणी सादर केली. प्रशांत दामले यांनी सादर केलेली गझल आणि सुख म्हणजे नक्की काय असते? या गीताला रसिकांनी टाळ्यांची विशेष दाद दिली. यावेळी सुधीर गाडगीळ यांनी विविध विषयावर या कलाकारांशी संवाद साधला.
लहानपणापासूनच गायनाची आवड होती, जरा बरा गात होतो, म्हणून शाळेतील गायन मास्तरांनी कोणीही गाणार नाही अशी एक गझल माझ्याकडून गावून घेतली आणि तिला श्रोत्यांकडून प्रचंड दाद मिळाली, मला वाटते ती माझ्या कला क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात होती. अशी आठवण प्रशांत दामले यांनी यावेळी सांगितल्या.
‘तुझे आहे तुझ्यापाशी’ हे माझे लाडके नाटक आहे. त्यातील काकाजी आणि सतीश हे माझे आवडते पात्र. तर मी मुंबईमध्ये आलो होतो, त्यावेळी ‘तो मी नव्हेच…’ या नाटकात प्रभाकर पणशीकर यांच्यासोबत एक छोटी भूमिका करण्याची संधी मला मिळाली होती. त्यानंतर २५ वर्षांनी त्या नाटकात मुख्य भूमिका करण्याची संधी मलामिळाली.त्यावेळी अतिशय आनंद झाला होता. या नाटकासाठी मी पणशीकर यांना भेटलो, त्यावेळी त्यांनी माझ्याकडून ते नाटक बसवून घेतले. अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. या नाटकांची वैशिष्ट्य म्हणजे ही अतिशय सुंदर प्रकारे लिहलेली आहेत, यातील कोणतेही पात्र मला करायला आवडतील, असे डॉ. गिरीश ओक यांनी सांगितले.
यावेळी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची आठवण सांगताना सुधीर गाडगीळ म्हणाले,” मी पंडितजींच्या संतवाणी या कार्यक्रमाचे निरुपण अनेक वर्षे केले. एकदा मंडईमध्ये संतवाणी हा कार्यक्रम झाला होता. रात्री २ वाजता कार्यक्रम संपला. कार्यक्रम झाल्यानंतर पंडितजी स्टेजवरच बसले होते. तेवढ्यात एक हमाल तेथून जात होता, त्याला पंडितजींनी आपल्या अनोख्या शैलीत विचारले कसा झाला कार्यक्रम? त्यावेळी तो म्हणाला, खूप छान पण ‘जो भजे हरी को….’ हे जर तुम्ही गायले असते, तर आणखी आवडला असता. त्यावेळी रात्री २:१५ वाजले होते, तरीही पंडितजींनी सर्व वादकांना वाद्ये पुन्हा लावायला सांगितली आणि ते भजन गाऊन दाखविले. संगीत ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पंडितजी अतिशय महत्त्व देत, आदर देत, हे या उदाहरणातून पुन्हा एकदा सिद्ध झाले होते.”
