जॉय ई- बाइकतर्फे नवी इलेक्ट्रिक दुचाकी मिहोस आणि इलेक्ट्रिक तीनचाकी जॉय ई- रिकचे वितरण सुरू
वडोदरा – वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. ही भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी जॉय ई बाइकची उत्पादक असून कंपनीने १९ एप्रिल २०२३ पासून नवी इलेक्ट्रिक दुचाकी मिहोस आणि इलेक्ट्रिक तीनचाकी जॉय ई- रिकचे वितरण सुरू केल्याची घोषणा केली. हे वितरण गुजरात व महाराष्ट्रमध्ये टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे.
वॉर्डविझार्डने पहिल्या टप्प्यात सुरू केलेल्या या वितरणामध्ये १५० मिहोस आणि ५० जॉय ई रिकचा समावेश असून गुजरात व महाराष्ट्रमध्ये त्यांचे वितरण केले जाणार आहे. वेगवेगळ्या राज्यांतील इतर शहरांतही टप्प्याटप्प्याने वितरण केले जाणार असून देशभरातील ६०० अधिकृत शोरूम्सद्वारे हे वितरण केले जाईल.
कंपनीने ऑटो एक्स्पो २०२३ दरम्यान १,३५,००० रुपये किंमतीत (पहिल्या ५००० ग्राहकांसाठी) इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली होती. नवी स्कूटर पॉली डायसायक्लोपेंटाडिनसह (पीडीसीपीडी) तयार आणि विकसित करण्यात आली असून त्यामुळे रस्त्यावर जास्तीत जास्त धक्के सहन करण्याची तिची क्षमता उंचावली आहे तसेच तिचा टिकाऊपणा व लवचिकता वाढली आहे.
वॉर्डविझार्डने ३,४०,००० रुपये किंमतीत (एक्स शोरूम) आपली पहिली इलेक्ट्रिक तीन चाकी जॉय ई- रिक ऑटो एक्स्पो २०२३ दरम्यान लाँच केली होती. जॉय ई- रिक टिकाऊ असून त्यातील सीट्स रूंद आहेत. या गाडीच्या देखभालीचाही खर्च कमी असल्यामुळे ते बाजारपेठेत उपलब्ध असलेले अत्याधुनिक व ग्राहकस्नेही आयओटी वैशिष्ट्यांनी युक्त अनोखे मॉडेल ठरले आहे.
वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. चे अध्यक्ष आणि व्यववस्थापकीय संचालक श्री. यतिन गुप्ते यानी वितरणास सुरुवात झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत म्हणाले, ‘आमची स्कूटर मिहोस आणि पहिली इलेक्ट्रिक तीन चाकी गाडी यांचे सुरू झालेले वितरण आमच्यासाठी लक्षणीय टप्पा आहे. यातून आमची ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी दर्जेदार, विश्वासार्ह आणि शाश्वत वाहने उपलब्ध करून देण्याची बांधिलकी अधोरेखित होते. आम्हाला खात्री आहे, की या वाहनांचे तंत्रज्ञान आणि स्टाइल ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करेल तसेच ईव्ही बाजारपेठेतील आमचा हिस्सा वाढेल. इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ तेजीत असून येत्या काही महिन्यांत आमची विक्रीही वाढेल असा अंदाज आहे.’
नवी वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर मिहोसमध्ये स्मार्ट आणि बुद्धीमान वैशिष्ट्ये देण्यात आली आहे, ज्यामुळे वाहन चालवताना चालकाची चांगली सोय होते. दुसरीकडे जॉय ई- रिक तीन चाकींच्या एल5 क्लासमध्ये येत असल्यामुळे त्यात ड्रायव्हिंगचा प्रशस्त आणि स्थिर अनुभव घेता येतो. जॉय ई- रिक निळा, पांढरा आणि सोनेरी पिवळा अशा तीन रंगांत उपलब्ध करण्यात आली आहे.
