‘लोककलेचा वसंतोत्सव’ तून पुणेकरांनी अनुभवली विविधेत एकता
पुणे : आसामच्या समृद्ध संस्कृतीतील लोकप्रिय बिहू लोकनृत्य त्यासोबत पारंपरिक वाद्याचे वादन…वीररस निर्माण करणारा पोवाडा, ठसकेबाज लावणी, डोळ्यांचे पारणे फेडणारे कथक यासोबत शास्त्रीय संगीत, सुफी संगीत ऐकण्याची पर्वणी रसिकांना मिळाली. आसाम आणि महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा पुणेकर आणि आसामी नागरिकांनी ‘लोककलेचा वसंतोत्सव’ तून अनुभवली. कलाकारांच्या सुंदर सादरीकरणातून विविधतेत एकता पहायला मिळाली.
भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् आणि आसाम येथील असोमी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र आणि आसाम राज्याचा ‘लोककलेचा वसंतोत्सव’ हा सांस्कृतिक मेळावा झाला. स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् च्या एरंडवणे येथील शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात हा मेऴावा झाला. यावेळी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम व शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, अर्शिया सेठी, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् चे संचालक प्रा.शारंगधर साठे, नृत्यविभाग प्रमुख देविका बोरठाकूर, असोमी संस्थेचे अध्यक्ष कर्नल तरुण बोरा (निवृत्त), उपाध्यक्ष मौशमी दत्ता बोरा, सांस्कृतिक विभाग प्रमुख चिरंजीब शर्मा उपस्थित होते.
प्रा. शारंगधर साठे म्हणाले, महाराष्ट्राप्रमाणेच इशान्येकडील साहित्य देखील समृद्ध आहे. या दोन्ही राज्याची सांस्कृतिक देवाण – घेवाण हो मेळाव्यातून झाली. आसामवरुन २७ कलाकार या कार्यक्रमासाठी आले होते. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून इशान्येकडील कलाकारांना व्यासपीठ मिळते. पुणेकरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावत उदंड प्रतिसाद दिला.
या सांस्कृतिक मेळाव्यात आसामचे नामवंत नृत्य व वाद्य कलाकार तसेच स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टसच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्राच्या कलाकारांनी पोवाडा, गौळणी, शास्त्रीय सुगम संगीत, सुफी संगीत, लावणी, डोळ्यांचे पारणे फेडणारे कथक नृत्य सादर केले. यासोबत आसामच्या कलाकारांनी बिहू लोकनृत्य, आदिवासी लोकनृत्य सादर केले.
