भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे १२५ वे जयंती वर्ष शासन साजरे करणार – देवेंद्र फडणवीस
अमरावती : भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख (Bhausaheb Dr. Punjabrao Deshmukh) यांनी शिक्षण, शेती, समाजप्रबोधन या क्षेत्रात दीपस्तंभासारखे कार्य केले. त्यांनी केलेल्या अद्भुत कार्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशाला दिशा मिळाली आहे. भाऊसाहेबांनी दीनदलित, शेतकरी, शेतमजूर यांच्या शाश्वत विकासासाठी राबविलेल्या संकल्पनेवरच शासनाची वाटचाल सुरु राहील, अशी ग्वाही देतानाच या महान, दूरदर्शी व द्रष्ट्या नेत्याला आदरांजली म्हणून त्यांचे 125 वे जयंती वर्ष शासनाच्यावतीने साजरे करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज केली.
शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 58 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व समारंभाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, खासदार अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभाताई खोडके, आमदार सर्वश्री प्रवीण पोटे, परिणय फुके, श्वेता महाले, प्रा.अशोक उईके, संस्थेचे कोषाध्यक्ष दिलिपबाबू ईंगोले, संदीप जोशी आदि मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री म्हणाले, भाऊसाहेबांनी दिल्लीत जागतिक कृषी प्रदर्शन भरवून कृषी व संलग्न क्षेत्रांना विकासप्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणले. देशाच्या कृषी क्षेत्रासाठी हे कृषी प्रदर्शन मैलाचा दगड ठरलेच शिवाय जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रात भारताचे नवे पाऊल टाकण्याचे काम या प्रदर्शनाने केले. देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा म्हणून शेतकऱ्याने काम केले पाहिजे यासाठी कृषी क्षेत्रात संशोधन करून शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी भाऊसाहेबांनी घेतलेले निर्णय मूलगामी परिणाम करणारे ठरले.
भाऊसाहेबांचे जाती प्रथा, अंधश्रद्धा निर्मुलन यासारखे समाजसुधारणेचे कार्यही बहुमोल आहे. अत्यंत ज्ञानी, अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या या नेत्याचे विचार आणि कार्य पुढील पिढीपर्यंत पोहाेचविण्यासाठी संस्थेने सुरु केलेल्या त्यांच्या स्मृती केंद्राच्या कामासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल. त्यांच्या जन्मस्थानी पापळ येथे कृषी महाविद्यालय निर्माण केले जाईल आणि संस्थेच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी दिली.
यावेळी खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून मेळघाटमधील रुग्णांना ने-आण करण्यासाठी संस्थेला बस उपलब्ध करुन देण्याची तर आमदार सुलभा खोडके यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था म्हणून धर्मशाळेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
