Tuesday, September 1, 2026
ENTERTAINMENTLatest NewsTOP NEWS

Movie Review – घर बंदूक बिरयानी

आशेच्या भांगेची नशा भारी.. अशी टॅग लाइन असलेला नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित ‘घर बंदूक बिरयानी‘ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके चित्रपट दिले आहेत. एका सर्वसाधारण विषयाला अनन्यसाधारण बनवणे, ही यांची खासियत आहे. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाच्या निमित्ताने एक चौकटी बाहेरचा, हटके, फुल्ल अॅक्शनपॅक्ड चित्रपट मराठीत आला आहे.

घर बंदूक बिरयानी चित्रपटाची कथा सांगायची ही महाराष्ट्रातील कोलारगड या भागातील आहे. या परिसरात पल्लम (सायाजी शिंदे) च्या टोळीनं पोलिसांच्या नाकीनऊ आणले आहेत. पोलिसांनी त्यांच्या माणसांना विनाकारण गोळ्या घालून ठार केल्याचे मत आहे, . काही झालं तरी पोलिसांना सोडायचे नाही. शरणागती तर अजिबात पत्कारायची नाही अशी त्यांची भूमिका आहे. राया पाटील (नागराज मंजुळे) हा एक धडाकेबाज पोलिस अधिकारी आहे. मुलींना छेडणाऱ्य भावी आमदाराच्या मुलांना त्याने खाकीचा दम दाखवला आणि त्यांची बदली थेट कोलारगडला झाली आहे. तर एका हॉटेलमध्ये राजू (आकाश ठोसर) आचाऱ्याचे काम करत आहे. अनाथ असलेल्या राजुळा लग्न करुन संसार थाटायचा आहे, मात्र घर नसणे ही त्यांची मोठी समस्या आहे. राया, पल्लम आणि राजू या तिघांच्याही जीवनात संघर्ष आहे, प्रत्येकाचा संघर्ष वेगळ्या प्रकाराचा आहे तसंच त्यात काही साम्य सुद्धा आहे.  ‘घर बंदूक बिरयानी’ बघितल्याशिवाय ते आपल्याळ समजणार नाही.

‘घर बंदूक बिरयानी’च्या  ट्रेलरवरून हा एक ॲक्शन चित्रपट असल्याचे कळत असले तरी यात तीन वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या  संवेदनशील कथा दडल्या आहेत. ‘आता चालच बिघडवायची आहे’ म्हणणारा राया पाटीलचा ‘हान की बडीव’ स्टाइल रावडी पोलिस,  रुचकर खाद्यपदार्थ करणारा राजू आणि  व्यववस्थेविरोधात लढणार पल्लम यापैकी कथेचा नेमका नायक कोण ? हे सांगता येणे अवघड आहे.  कथानकात अनेक बारकावे तपाशीलवारपणे मांडण्यात आले आहेत. नागराज सातत्याने प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध भाष्य करतो हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. बंडखोर लोकांचे प्रश्न मांडत असताना तो पोलिस प्रशासनातील हीन राजकारण ही सक्षमपणे मांडतो.
घर बंदुक बिरयानीमधील गुन गुन, आहा हेरो, हान की बडीब आणि टायटल सॉन्ग अशी सगळीच गाणी चांगली झाली आहेत. वैभव देशमुख यांच्या गीतांना संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.  चित्रपटाचे संगीत  समर्पक आणि काही ठिकाणी कथेला पुढे घेऊन जाणारं आहे.  परंतु काही ठिकाणी गाण्यांची लांबी कमी केली असती तर प्रभाव अधिक जाणवला असता असे वाटते. विक्रम अमलादी यांचं छायाचित्रीकरणही लक्षवेधी झालं आहे,

चित्रपटातील कलाकारांचा उत्तम अभिनय ही  एक जमेची बाजू आहे. सयाजी शिंदे यांचं पल्लम हे पात्र फार मजेशीर, धमाल आहे अन् सयाजी यांनी ते अगदी सहज निभावलं आहे. सयाजी शिंदे आणि नागराज यांच्या भूमिकांनी चित्रपट वेगळ्याच उंचीवर गेला आहे. अभिनेता म्हणून नागराजने यापूर्वीही आपली छाप सोडली आहेच मात्र त्याने साकारलेला राया पाटील जबरदस्त आहे. मराठीमध्ये यापूर्वी अशा प्रकारची भूमिका साकारल्याचे आठवत नाही.  आकाश ठोसरने साकारलेला राजू ‘सैराट’ मधील परश्या पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. सायली पाटीलनेही तिची भूमिका उत्तम साकारली आहे. याशिवाय विठ्ठल काळे, सोमनाथ अवघडे, सुरज पवार, अरबाज शेख, तानाजी गालगुंडे, प्रवीण डाळिंबकर यांनीही आपल्या भूमिकांनी लक्ष वेधून घेतले आहे.

थोडक्यात सांगायचे तर चित्रपटाची लांबी अधिक असली तरी मराठीतील फुल्ल अॅक्शनपॅक्ड असा घर बंदूक बिरयानी कथानक, दर्जेदार मांडणी, उत्तम संगीत, संवाद आणि अभिनयासाठी चित्रपटगृहात जाऊनच बघायला हवा.

चित्रपट – घर बंदूक बिरयानी

निर्माते – आटपाट, झी स्टुडिओज

लेखक – नागराज मंजुळे, हेमंत अवताडे

संगीत – ए. व्ही. प्रफुल्लचंद्र

दिग्दर्शक – हेमंत जंगल अवताडे

कलाकार – सायाजी शिंदे, नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सायली पाटील, दीप्ती देवी, विठ्ठल काळे, श्वेतांबरी घुडे, सोमनाथ अवघडे, सुरज पवार, अरबाज शेख, तानाजी गालगुंडे, प्रवीण डाळिंबकर

रेटिंग – ***

-भूपाल पंडित 

  • pbhupal358@gmail.com

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading