‘डेली सोप’ माध्यमात तुमची वाढ नकोशी असते, म्हणून मी काम थांबवले – सचिन खेडेकर
पुणे : मी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करत असताना आठवड्याला एक भाग असे मालिकांचे प्रसारण होत असे. परंतु आता डेली सोप्सच्या काळात दररोज एक भाग अशा प्रकारे हे प्रसारण होते. याला अर्थात काही मर्यादा आहेत. या मालिका पाहणा-या प्रेक्षकांचा एक महिन्याचा शो चुकला तरी त्या मालिकेत पुढे काही विशेष होत नाही ही आजची पद्धत आहे. मात्र जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगात जगता तिथे पाहून पाहून तुमच्या बुद्धीत आणि क्षमतेत होणारी वाढ तिथे डेली सोप्समध्ये नको असते. एखाद्या मोठ्या शेफला बरेच चांगले पदार्थ येत असताना तू फक्त रोज वरणभातच कर असे सांगण्यासारखा हा प्रकार आहे आणि म्हणूनच मी आजकालच्या मालिकांमध्ये काम करणे थांबवले, असे परखड मत प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केले.
केशवबाग येथे झालेल्या आणि बेलवलकर सांस्कृतिक मंचतर्फे आयोजिलेल्या कलारंग महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी खेडेकर यांची मुलाखत सुप्रसिद्ध मुलाखतकार राजेश दामले यांनी घेतली त्या वेळी ते बोलत होते. या आधी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांच्या हस्ते सचिन खेडेकर यांचा निळू फुले सन्मानाने गौरव करण्यात आला. बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे समीर व अजित बेलवलकर, निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले- थत्ते, जावई ओंकार थत्ते आदी यावेळी उपस्थित होते.
मुलाखती दरम्यान विविध दिग्दर्शकांचा आपल्यावर असलेल्या प्रभावावर देखील सचिन खेडेकर यांनी भाष्य केले यामध्ये प्रामुख्याने विनय आपटे, वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी आणि सई परांजपे यांचा समावेश होता. तसेच यावेळी आजच्या पिढीतील निपुण धर्माधिकारी, वरुण नार्वेकर, किरण यज्ञोपवित या दिग्दर्शकांविषयी बोलताना बोलताना खेडेकर म्हणाले, “नव्या दिग्दर्शकांनी जुने ठोकळेबाज विचार व चौकटींना काट मारली आहे. त्यांचा आविष्कार नवीन आहे. त्यांच्याकडे अधिक स्वतंत्रता आहे. ते लेखक आहेत, हे त्यांचे बलस्थान आहे. परंपरांची ओझी त्यांच्या पाठीवर नाहीत.”
आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठे स्थित्यंतर म्हणजे श्याम बेनेगल यांचा ‘बोस – दि फरगॉटन हिरो’ हा चित्रपट आहे असे सांगत खेडेकर म्हणाले, “यामधील सुभाषचंद्र बोस यांच्या मध्यवर्ती भूमिकेसाठी वेळ देणे, तिचा अभ्यास करणे, ती आत्मसात करणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. मी याआधी पंधरा वर्षे काम केले होते ते काम एका बाजूला आणि त्यानंतरचा अभिनेता म्हणून असलेला मी एकीकडे असा हा अनुभव होता, या चित्रपटाने मला सर्व गोष्टी दिल्या आणि म्हणून हा चित्रपट माझ्याआसाठी महत्त्वाचा ठरला. या आधी मी देशभक्त होतोच, पण या चित्रपटाने मी ‘नॅशनल कॅरेक्टर’ झालो. मी ज्या क्षेत्रात आहे, त्या क्षेत्राची नव्याने ओळख करून देण्याचे काम बेनेगल यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून केले.”
विनय आपटे हे माझे गुरु. मला जे काही येतं ते त्यांच्यामुळे, असं मी नेहमी म्हणतो. त्यांनी आम्हाला काय दिले तर योद्ध्यासारखं कसं जगावं ते शिकवलं असे सांगत खेडेकर म्हणाले, “आवाज कसा वापरायचा ते मला आपटे यांनी शिकवले. त्यांनी शिकवलेलं मराठी अजुनही मला पुरून उरलं आहे. या क्षेत्रात कसं वागावं लागतं, कशावर कमांड असावी लागते, हे त्यांच्यामुळे कळाले. एकेकाळी मी अगदी त्यांच्यासारखे काम करायचो आणि त्या प्रभावातून बाहेर यायला मला पाच वर्ष लागली.”
लिखाणातील जागरूकता सई परांजपे यांच्याकडे खूप होती. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात त्या त्या माध्यमानुसार काम करण्याची त्यांची क्षमता असल्याचे खेडेकर म्हणाले. तर वामन केंद्रे आल्यानंतर त्यांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन आम्हाला समजला. चंद्रकांत कुलकर्णी यांनी सगळ्या माध्यमांमध्ये काम केलं. त्यांला आम्ही जादूगार म्हणतो असे सांगत विक्रम गोखले यांचीही आठवण खेडेकर यांनी काढली. या वेळी ते भावूक झाले होते.
