कला जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने रोमर्टिका तर्फे सामूहिक चित्रप्रदर्शनाचे आयोजन
पुणे : कला जागरू कता पसरवण्याच्या उद्देशाने रोमर्टिका आर्ट डीकोडेड, पुणे यांच्या वतीने कोरेगाव पार्क येथील मलाका स्पाइस गॅलरी-कम-रेस्टॉरंटमध्ये चित्रकले चे सामूहिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये एका पाठोपाठ दोन ग्रुप शो होतील. पहिला टप्पा 1 ते 14 एप्रिल आणि दुसरा टप्पा 15 ते 30 एप्रिल दरम्यान असेल. फेज वन ग्रुप शोचे उद्घाटन पुणे बिझनेस स्कूलच्या डीन डॉ. मंजू चोप्रा यांच्या हस्ते झाले.
पहिल्या टप्प्यातील या चित्रप्रदर्शनात पल्लवी चौधरी, अर्चना केसरवानी, हीना पालोबा, आशा राघव मोहन, निकिता गर्ग आणि तन्वी पारेख हे कलाकार सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनात हीना पालोबा यांचे अॅब्स्ट्रॅक्ट्स रोथको आणि मॉन्ड्रियनची आठवण करून देतात. तर तन्वी पारेखची चित्रे अध्यात्मिक आणि भारतीय शास्त्रीय आकर्षणात मिसळलेल्या उत्सवाच्या भावनेने स्पंदन करतात. निकिता गर्ग यांचे लँडस्केप चित्र प्रेक्षकांना शांतता देतात. तर आशा राघव मोहन यांचे निसर्गाचे चित्रण डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत. अर्चना केसरवानींची फुले मनमोहक आहेत. तसेच काही कलाकृतींमध्ये, निसर्गाचा एक अतिवास्तव पैलू दर्शकांना भुरळ घालते.
कला जागरूकता पसरवण्याचे रोमर्टिकाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. या एप्रिल शो दरम्यान रोमर्टिका इंटेरिअर डेकोरेटर्स आणि आर्किटेक्ट्सना आमंत्रित करण्यासाठी विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. याशिवाय, 22 एप्रिल रोजी, क्लब रोमर्टिका संध्याकाळी मलाका येथे परफॉर्मन्स आर्टचे सादरीकरण केले जाणार आहे.
