Tuesday, September 1, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आमच्या हिंदुत्वाचे मोजमापं घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

छत्रपती सांभाजीनगर : मालेगावातल्या सभेत असंख्य मुस्लीम बांधव आले होते. इथेही आले असतील. माझ्यावर आरोप करतायत की, मी हिंदुत्व सोडलं. तुम्ही मला एक उदाहरण दाखवा जिथे मी हिंदुत्व सोडलंय. मी आता इथून घरी जाऊन बसेन, तुम्हाला पुन्हा तोंड दाखवणार नाही. मी काँग्रेससोबत गेल्यावर हिंदुत्व सोडलं असेल, तर मुफ्ती मोहम्मद सैद, मेहमुबा मुफ्ती यांच्यासोबत तुम्ही काश्मीरात मांडीला मांडी लावून बसलात, तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं. आमच्या हिंदुत्वाचे मोजमापं घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही म्हणाल तोच हिंदू आणि तुम्ही म्हणाल तोच देशद्रोही अशी तुमची वृत्ती असेल, तर ती गाडण्यासाठी आम्ही वज्रमूठ केली आहे, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. 

रविवारी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली.  आजच्या या सभेला उद्धव ठाकरे यांच्यासह  विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी उपस्थित होते. 

 हल्ली महाराष्ट्रात हिंदू जनआक्रोश सुरू झाला आहे. मुंबईतही काढला होता. मुंबईत कुठून काढला मला माहिती नाही, पण शिवसेना भवनापर्यंत आणला. मी म्हटलं याचा अर्थ एकच आहे. जगातला सर्वात शक्तिमान हिंदू नेता, देशाचा पंतप्रधान झाल्यानंतरही देशातल्या हिंदूंना आक्रोश करायला लागतोय, त्या नेत्याची शक्ती काय कामाची आहे? मविआचं सरकार होतं. हिंदू, मुस्लीम अशा कोणत्याही धर्मीयांना आक्रोश करण्याची वेळ आम्ही येऊच दिली नव्हती, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांसह राज्य सरकारवर टीका केली.

२५ वर्षं आपण एका वेगळ्या भ्रमात होतो. भाजपासोबत आपली युती होती. दोनदा सरकार आलं. पण औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं होतं का? म्हणून मला अभिमान वाटतो, मविआच्या सर्व नेत्यांना मी धन्यवाद देतो, आजपर्यंत आम्ही सोबत असताना जे भाजपाला जमलं नाही, ते मविआ सरकारनं करून दाखवलं आहे. याच एका गोष्टीवरून त्यांची वृत्ती कशी आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. करायचं काही नाही फक्त कोंबडे झुंजवत बसायचं. निवडणुका आल्यावर जातीय तेढ निर्माण करायची. जेव्हा जेव्हा जातीय तेढ निर्माण व्हायला लागेल तेव्हा समजा निवडणुका उंबरठ्यावरती आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हल्ली असं म्हणतात डॉक्टरेटही विकत घेता येते. मला कोणाचाही संदर्भ द्यायचा नाहीये. पण काहीजण पाण्याची इंजेक्शन घेऊन फिरतात. परंतु आज अनेक तरुण पदवीधर होतायत. पदवी दाखवूनही एकीकडे किंमत मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांची पदवी मागितली, तर २५ हजार दंड होतोय. अशी कोणती पदवी आहे त्यांच्याकडे? कॉलेजलाही हा अभिमान असायला हवा की, आमच्या कॉलेजमधला एक व्यक्ती पंतप्रधान झालाय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र आलो होतो. हो आलो होतो. पण आता सत्ता गेल्यानंतरही आम्ही एकत्र आहोत. उलट आता आम्ही घट्ट झालो आहोत. अमित शाहांनी पुण्यात म्हटलं होतं की, सत्तेसाठी मी काँग्रेस, राष्ट्रवादीचे तळवे चाटले. असं काही नाहीये की मला शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही. पण काही शब्द, भाषा त्यांनाच शोभणारी आहे, मला ती शोभणार नाही. पण मी फक्त एवढंच म्हणालो, की आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटतो, तर तुम्ही सत्तेसाठी मिंध्यांचं काय चाटताय?, असा सवाल उपस्थित करत ठाकरेंनी भाजपवर टीका केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading