Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

वितस्था साहित्यिकांची जीवनवाहिनी आणि प्रेरणास्थान : प्राण किशोर कौल

पुणे : वितस्था ही केवळ नदी नसून जम्मू-काश्मीरची संस्कृती, सांस्कृतिक वारसा असून जीवनवाहिनी आहे. साहित्यिकांचे प्रेरणास्थान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ काश्मिरी नाटककार, कथाकार, निर्माते, साहित्य अकादमी पुरस्कारविजेते प्राण किशोर कौल यांनी केले. वितस्था नदीच्या तसेच जम्मू-काश्मीरच्या संस्कृतीचा अधिक खोलवर अभ्यास होऊन हा इतिहास अभ्यासकांनी जगासमोर आणावा, अशी अपेक्षा काश्मिरी संस्कृतीचे अभ्यासक आणि वितस्था महोत्सवाचे नॉलेज पार्टनर सिद्धार्थ काक यांनी केली.
केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वितस्था महोत्सवाअंतर्गत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, संस्कृती मंत्रायल आणि साहित्य अकादमीच्या सहयोगाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपासून (दि. 1 एप्रिल) दोन दिवसीय वितस्था का विस्तार : काश्मीर महोत्सवअंतर्गत गोदावरी और वितस्था : एक सांस्कृतिक यात्रा या विषयी चर्चासत्र, परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित चर्चासत्र ज्ञानेश्वर सभागृहात होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू कारभारी विश्वनाथ काळे होते. ज्येष्ठ काश्मिरी नाटककार, कथाकार, निर्माते, साहित्य अकादमी पुरस्कारविजेते प्राण किशोर कौल, सिद्धार्थ काक यांची प्रमुख उपस्थिती होती. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव व्यासपीठावर होते. आझादी का अमृत महोत्सव उपक्रमाच्या सल्लागार गौरी बसू, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे सहाय्यक संचालक दीपक कुलकर्णी, वितस्था महोत्सवाच्या स्थानिक समन्वयक चित्रा देशपांडे, विद्यापीठाचे डॉ. संतोष परचुरे यांच्यासह विद्यार्थी, अभ्यासक उपस्थित होते.
जम्मू-काश्मीरच्या लोकजीवनात वितस्था नदीच्या स्थानाची महती विशद करून प्राण किशोर कौल म्हणाले, राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रत्येक प्रदेशाचा सांस्कृतिक वारसा जपत साहित्यिकांच्या साहित्यकृतींची देवाण-घेवाण व्हावी यासाठी राष्ट्रीय स्तरावर नॅशनल इस्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन्सची स्थापना होणे गरजेचे आहे. वितस्था नदीच्या तिरी अनेक ऐतिहासिक घटना घडल्या, अनेक युद्धे लढली गेली आहेत. अनेक शायर, कवी, कथाकार यांचे साहित्य फुलले-जडणघडण झाली. आईच्या दुधाबरोबरच वितस्था नदीचे पाणी पिऊन आपण मोठे झालो असल्याचे त्यांनी गौरवाने सांगितले.
सिद्धार्थ काक म्हणाले, अभ्यासकांनी जम्मू-काश्मीरची संस्कृती दर्शविणाऱ्या स्थानिक पातळीवरील साहित्याचाही अभ्यास करून त्याचे वैशिष्ट्य, साहित्य निर्मितीमागील इतिहास अभ्यासून या लोकसाहित्याचे जतन करणे आवश्यक आहे. अशा लोकसाहित्यातून पुढील पिढीला महान वारसा आणि संस्कृती कळण्यास मदत होईल. हा ठेवा अमूल्य आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कारभारी विश्वनाथ काळे म्हणाले, पुणे आणि पुणे विद्यापीठाला मोठा शैक्षणिक वारसा आहे. या महोत्सवामुळे ज्ञानाचे आणि संस्कृतिचे आदान प्रदान होण्यास मदत होईल. ज्ञान-विज्ञान-साहित्य आणि संस्कृतीला आपल्या आयुष्यात मोठे स्थान आहे. ही संस्कृती आता विस्मरणात जात आहे. साहित्य-सांस्कृतिक उपक्रमांमुळे यांचे स्मरण आणि जतन होण्यास मदत होईल. शरीर सशक्त ठेवण्यासाठी जसे रक्तवाहिन्यांचे कार्य मोलाचे ठरते त्याचप्रमाणे संपूर्ण देशाला सशक्त ठेवण्यासाठी नद्यांची गरज असून त्यांचे संवर्धन व्हायला हवे.
स्वागत आणि प्रास्ताविकात के. श्रीनिवासराव म्हणाले, नद्या हे अनेक संस्कृतींचे उगमस्थान आहे. त्यांची पवित्रता जपणे, भारतीय संस्कृतीचे जतन करणे आवश्यक आहे. याच हेतूने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात स्वरस्वती आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन आणि दीपप्रज्वलन करून झाली. स्वागत के. श्रीनिवासराव यांनी केले. आभार व्यक्त करताना डॉ. दीपक खिरवडकर यांनी वितस्था महोत्सव आणि त्या अंतर्गत आयोजित केलेल्या चर्चासत्राची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्य अकादमी दिल्लीचे संपादक अनुपम तिवारी यांनी केले.
उद्घाटन सत्रानंतर गोदावरी और वितस्था : एक सांस्कृतिक यात्रा या विषयी वसंत शिंदे, गोदावरी नदी के अष्टांग स्थल या विषयी अरुण चंद्र पाठक, सांस्कृतिक विरासत पदचिन्हों का मूर्त और अमूर्त सम्मिश्रण तथा गोदावरी नदी के आसपास इसका महत्त्व या विषयी शुभाश्री उपासनी, गोदावरी और वितस्था की सांस्कृतिक प्रवाह धारा या विषयी सी. के. गरियाली, ललद्यद और नुंद ऋषि या विषयी रूप कृष्ण भट्ट आणि अभिनय योग या विषयी ललित परिमू यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading