तुळशीबाग श्रीराम मंदिरात लळीत पायघडया व श्रीरामराज्याभिषेक सोहळा उत्साहात
पुणे :रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम… श्रीराम जय राम जय जय राम चा अखंड गजर करीत पांढ-या कापडावरील प्रभू श्रीरामांच्या पावलांवर फुलांची उधळण करण्यासोबतच पुणेकरांना तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात पायघडयांचे दर्शन झाले. कीर्तनाने प्रसन्न झालेल्या भक्तीमय वातावरणात लळीत पायघड्यांचा सोहळा उत्साहात पार पडला. श्रीरामजन्मानंतर तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात लळीत पायघड्यांचा सोहळा साजरा केला जातो. संपूर्ण भारतात पायघड्यांचा हा सोहळा पुण्यातील तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात साजरा होतो, हे विशेष.
श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात लळीत पायघड्या व श्रीराम राज्याभिषेकाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण तुळशीबागवाले कुटुंबातील सदस्यांनी पायघड्यांचे कीर्तन केले. तसेच कुटुंबातील सदस्य व संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद चंद्रकांत तुळशीबागवाले यांच्या हस्ते श्रीराम राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
सोहळ्याला संस्थानचे विश्वस्त राघवेंद्र तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. रामनवमी उत्सवाचे यंदा २६२ वे वर्ष आहे. यावेळी उत्सवकाळातील मानक-यांचा सन्मान देखील करण्यात आला. कीर्तनकार ह.भ.प. उद्धव बुवा जावडेकर यांचे कीर्तनही झाले.
श्रीपाद तुळशीबागवाले म्हणाले, श्रीरामजन्माननंतर पायघड्यांचा हा सोहळा फक्त तुळशीबागेतील राम मंदिरात साजरा केला जातो. नविन पांढºया शुभ्र वस्त्रावर श्रीरामांच्या पावलांचे ठसे उमटविले जातात आणि हे वस्त्र गाभाºयापासून सभामंडपापर्यंत आणले जाते. यावेळी लळीत पायघड्या चे कीर्तन करण्यात येते. त्यानंतर श्रीरामांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होतो. सोहळ््यानंतर उत्सवकाळातील मानक-यांचा पुष्पहार व श्रीफळ देवून सन्मान करण्यात येतो, असे ही त्यांनी सांगितले.
