fbpx

पुणेकरांना मराठी युगुलगीतांचा सुरेल नजराणा

पुणे : अधीर मन झाले… उगवली शुक्राची चांदणी… गोऱ्या गोऱ्या गालावर … सैराट झालं जी अश्या एकाहून एक सरस गीतांचा सुरेल नजराणा पुणेकरांसमोर पेश झाला. नव्या ढंगात युवा कलाकारांनी सादर केलेल्या गीतांना पुणेकरांनी टाळ्यांच्या ठेक्यात तर कधी सुरात सूर मिसळत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या सातव्या दिवशी ‘स्वर गुंजारव’ कार्यक्रमात गायक अजित परब, संदीप उबाळे, योगिता गोडबोले, संज्योती जगदाळे या युवा गायकांनी गीतांचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाची सुरुवात शंकर महादेवन यांच्या सूर निरागस हो… या गणेश वंदनेने झाली. आज अनेक शाळांचे बोधगीत म्हणून गायले जाणारे हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे… हे गीत अजित परब यांनी सादर केले. त्यानंतर योगिता गोडबोले यांनी गायलेल्या वारा गाई गाणे, प्रीतीचे तराणे, गोमू संगतीनं… यांसारख्या गीतांनी मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ जागविला.

तर, देवाक काळजी रे या गीताला रसिकांची विशेष दाद मिळाली. उगवली शुक्राची चांदणी…राधा ही बावरी… सौराट झाल जी या गीतांना भरभरू प्रतिसाद देत तरुणाईने जल्लोष केला. पुष्कर श्रोत्री यांनी प्रत्येक गाण्याचे रंजक किस्से सांगत त्यांच्या निवेदनाने कार्यक्रमाला एक उंची प्राप्त झाली. संगीत महोत्सव दि. ३० मार्च पर्यंत होणार असून गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ७ ते १० यावेळेत दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: