अमेरिका आणि चीनच्या पलीकडे जात भारताने आपला स्वतंत्र मार्ग निवडावा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: चीनविषयक धोरणात्मक संवाद परिषदेत तज्ज्ञांचा सुर
पुणे – दुसऱ्या महायुद्धनंतर ज्याप्रकारे अमेरिकेने जागतिक नेतृत्व करण्यासाठी प्रयत्न केले तसेच प्रयत्न हे सध्या चीनकडून केले जात आहेत. जागतिक महासत्ता होण्यासाठीचे चीनचे हे प्रयत्न सुरू असेल तरी भारताने या दोन्ही देशांच्या पावलावर पाऊल न ठेवता आपला स्वतंत्र धोरणात्मक मार्ग निवडावा असा सूर दोन दिवसीय ‘ चीनचा उदय आणि त्याचे जागतिक परिणाम ‘ या धोरणात्मक संवाद परिषदेत उमटला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ही परिषद २७ व २८ मार्च मध्ये संपन्न झाली. या परिषदेचे उद्घाटन लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या उपस्थितीत झाले. यामध्ये कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांच्यासह या विषयातील २० हून अधिक तज्ज्ञ मंडळी सहभागी झाली होती. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात चीनचे धोरण, चीनची तैवान वरील भूमिका व दक्षिण चीन सागरातील चीनच्या भौगोलिक विस्तारासाठी सुरू असलेल्या हालचाली, भारतावर वैचारिक प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी चीनचे प्रयत्न आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या परिषदेत विषयातील अभ्यासक, तज्ज्ञ व्यक्ती सहभागी झाले होते.
महासत्ता होण्यासाठी चीनकडून होणारे प्रयत्नात नाविन्य नाही हीच त्यांची कमकुवत बाब आहे. भारताने आपल्या अर्थव्यवस्था मजबूत करत आपला जागतिक स्थान प्रस्थापित करावे. यासाठी नवे मार्ग निवडण्याची गरज असल्याची चर्चा यावेळी करण्यात आली. बॉलिवूड आणि समाजमाध्यमे, वृत्तपत्रे आदींमध्ये चीनकडून विचारांचा प्रभाव कश्या प्रकारे पडला जात आहे हे देखील उदाहरणासहित स्पष्ट करण्यात आले. या दोन दिवसीय धोरणात्मक संवाद परिषदेचे अभ्यासपूर्ण अहवालात रुपांतर करत केंद्र सरकारला सादर करण्याची शिफारस देखील यावेळी उपस्थितांनी केली.
हा संवाद घेण्यामागे चीनचे धोरण अधिक व्यापाकतेने समजून घेणे आणि त्याबाबत केवळ अभ्यासक व विद्यार्थी नाही तर सर्वांना जागरूक करणे हा हेतू असल्याचे सेंटर फॉर चायना अनालीसिस अँड स्ट्रॅटेजीचे अध्यक्ष डॉ.जयदेव रानडे यांनी सांगितले.
यावेळी विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.विजय खरे यांनी सर्वाचे आभार मानले. ही दोन दिवसीय परिषद महाविद्यालयातील दोन लाख विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरूपात सहभागी होण्यासाठी उपलब्ध करून दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिरकाव, चीनकडून तंत्रज्ञानाचा होणारा वापर आदी विषय देखील चर्चेसाठी घेण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवत त्यांच्यासाठी या विषयावरील निबंध स्पर्धा आयोजित केल्या जाणार असल्याचेही खरे यांनी सांगितले.