fbpx

पर्णकुटी संस्थेतर्फे महिलांना स्वयंरोजगाराचे धडे; हक्काचे व्यासपीठ दिले मिळवून 

पुणे  : शहर परीसरातील महिला व वंचित समुदायासाठी पर्णकुटी संस्थेच्या वतीने ‘धारा’ प्रकल्पांतर्गत बेसिक टेलरिंग, बेकरी उत्पादने, कुकिंग व केटरिंग, ब्युटी पार्लर, मसाले तयार करणे, कापडी पिशव्या बनविणे, व्यवसाय व्यवस्थापन, व्यक्तिमत्व विकास आदी विषयांवर वडगाव शेरी येथे विनामूल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी पर्णकुटी संस्थेच्या सह-संस्थापिका स्नेहा भारती, कोंगा कंपनीच्या स्नेहल काळे, गजानन पुजारी, पीडब्ल्यूसी इंडिया फाउंडेशनचे दीपक महुरकर, गीतांजली सेन, हेक्सावेअरचे पंकज वाघमारे, एआरसी फोरमच्या पौर्णिमा गादिया, निवृत्त सनदी अधिकारी विनोद कुमार (बिहार केडर), लोनटॅप कंपनीचे सत्यम कुमार, डॉकबॉईझ कंपनीचे प्रशांत कुमार, शॉपेक्स कंपनीचे अमित शर्मा, लाईटहाऊस कम्युनिटीचे विकी काव, सचिन चौधरी, फुटलॉकर कंपनीचे ज्ञानेश्वर डफळ, तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

सायली तारू यांनी महिलांना डिजिटल साधनांचा उपयोग करून आपल्या उत्पादनाची मार्केटिंग व जाहिरात कशी करावी, यासंबंधी मार्गदर्शन केले. श्रुती डिंबळे यांनी व्यवसाय करताना व्यावसायिक दृष्टिकोन कसा असावा, याबाबत मार्गदर्शन केले, तर सुरेश उमप यांनी सकारात्मक दृष्टिकोनाचे वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातील महत्त्व यावर मार्गदर्शन केले. यावेळी महिलांनी स्वतः शिवलेले ड्रेस व कापडी पिशव्या परिधान करून रॅम्प वॉल्क’ देखील केला.

दरम्यान, संस्थेतर्फे दोन महिला व एक वंचित घटकातील व्यावसायिक यांना त्यांच्या व्यवसायासाठी बीज भांडवल व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. लाभार्थ्यांनी बनविलेल्या कुकीज, चॉकलेट व डोनट्स, कापडी पिशवी, चहा मसाला, हर्बल साबण, पेपर बॅग्स अशी विविध उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. यावेळी उपस्थित महिलांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 सूत्रसंचालन नेहा ठाकूर व पूनम लोंढे यांनी, तर स्नेहा भारती यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: