fbpx

नाट्यगीते, भक्तिगीतांतून निखळ भक्तीची अनुभूती

पुणे : भाग्यदा लक्ष्मी बारम्मा… ‘आरंभी वंदीन अयोध्येचा राजा’… ‘राधाधरमधुमिलिंद जय जय’…’मन हो राम रंगी रंगले’ अशा एकाहून एक सरस भक्तिगीते सादर करीत आनंद गंधर्व आनंद भाटे यांनी आपल्या स्वराविष्कराने रसिकांना मंत्रमुग्ध केले. पेशवेकालीन तुळशीबाग राम मंदिरा झालेल्या स्वरमैफलीतून निखळ भक्तीची अनुभूतीच जणू त्यांनी आपल्या स्वरातून रसिकांना दिली.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पं.आनंद भाटे यांनी गायनसेवा अर्पण केली. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद चंद्रकांत तुळशीबागवाले, विश्वस्त राघवेंद्र तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.

पुरीया कल्याण रागाने त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. यामध्ये तीन तालातील ‘बहुत दीन बिते’ ही बंदीश त्यांनी सादर केली. त्यानंतर ‘मोरे श्याम आज हू न आये’ ही सुंदर रचना त्यांनी सादर केली. समर्थ रामदास स्वामी यांनी लिहीलेला ‘आरंभी वंदीन अयोध्येचा राजा’ हा अभंग सादर करताच श्रोत्यांनी त्यांना भरभरून दाद दिली.

‘राधाधरमधुमिलिंद जय जय’ या सौभद्र नाटकातील गीताच्या सादरीकरणाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर त्यांनी पं. भीमसेन जोशी यांनी गायलेली ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली’ ही संतवाणी सादर केली. ‘मन हो राम रंगी रंगले’ हे नाट्यगीत आणि त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजात प्रसिद्ध असलेले ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ हे कानडी भक्तिगीत सादर करताच श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. राग भैरवीमधील ‘अगा वैकुंठीच्या राया अगा विठ्ठल सखया’ या सुंदर भक्तीगीताने कार्यक्रमाचा त्यांनी समारोप केला.

Leave a Reply

%d bloggers like this: