तरुणाईने पुस्तक दिंडीच्या माध्यमातून दिला एकात्मतेचा संदेश
पुणे : सुख-समृद्धी आणि मांगल्याचे प्रतिक असणारी गुढी उभारुन, पुस्तकांचे पूजन करुन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत तरुणाईने एकात्मतेचा संदेश दिला. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे नानाविध पुस्तकांचे वाचन करीत आपली ज्ञानसंपदा वाढविण्यासोबतच विचारसंपदा वाढवावी आणि आपण सगळे एक आहोत, हा संदेश द्यावा याउद्देशाने मान्यवर मंडळींनी तरुणवर्गासोबत दिंडीत सहभाग घेतला.
निमित्त होते, मैत्र युवा फाऊंडेशनतर्फे गुढीपाडव्याच्या परंपरेला सामाजिकतेची जोड देत एकात्मतेची गुढी उभारत बाजीराव रस्त्यावरील आचार्य अत्रे सभागृहाबाहेर आयोजित पुस्तक दिंडी च्या कार्यक्रमाचे. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.न.म.जोशी, साहित्यिक डॉ.मिलिंद जोशी, व्यंगचित्रकार चारुहास पंडित, डॉ. प्रसाद जोशी, पराग ठाकूर, डॉ.भावार्थ देखणे, अभिनेता तेजस बर्वे, डॉ.सचिन वानखेडे, तेजस्वी सेवेकरी, अश्विनी नायर, चिंतामणी पटवर्धन, मैत्रयुवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे आदी उपस्थित होते.
संकेत देशपांडे म्हणाले, गुढी आरोग्याची, गुढी परंपरेची, गुढी साहित्याची, गुढी मांगल्याची, गुढी संस्काराची असा संदेश पुस्तक दिंडीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असतो. यावर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र करुन तरुणाईशी संवाद साधण्याच्या उद्देशाने एकात्मतेची गुढी उभारण्यात आली. आपापल्या साहित्यातून प्रत्येक लेखकाने एकात्मतेचा व एकजुटीचा संदेश दिला आहे. तोच वारसा पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या सामाजिक उपक्रमासाठी यावेळी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.