गुढीपाडव्यानिमित्त तुळशीबागेतील श्रीराम-लक्ष्मण-सीता मूर्तीस पवमान अभिषेक
पुणे :तुळशीबागेतील पेशवेकालीन राममंदिरात मंत्रपठण, श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष, श्रीविष्णूसहस्त्रनाम, श्रीसूक्त, पुरूषसूक्त पठण आणि रामकथेच्या स्वरांचा निनाद अशा मंगलमय वातावरणात श्रीराम-लक्ष्मण-सीता मूर्तीस पवमान अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर मूर्तींना पोशाख व दागिने घालण्यात आले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी सकाळपासून मंदिरात गर्दी केली होती.
श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने बुधवार, दिनांक २२ मार्च ते रविवार, दिनांक ९ एप्रिल दरम्यान श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद चंद्रकांत तुळशीबागवाले, विश्वस्त राघवेंद्र तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामधे यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६२ वे वर्ष साजरे होत आहे.
श्रीपाद तुळशीबागवाले म्हणाले, गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान होणा-या श्रीरामजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरात आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. उत्सवांतर्गत दि. २२ ते २९ मार्च दरम्यान दररोज सकाळी ९ वाजता श्री गणेश्वर शास्त्री पारखी यांचे सुश्राव्य रामकथा प्रवचन, दुपारी १२ वाजता श्रीरामांची महापूजा व आरती, सायंकाळी ७.३० वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक व आरती महापूजा होणार आहे.
दिनांक २२ ते २९ मार्च दरम्यान दररोज सायंकाळी ५ वाजता प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तसेच शुक्रवार, दिनांक २४ मार्च रोजी पं.आनंद भाटे यांचे गायन आणि मंगळवार, दिनांक २८ मार्च रोजी पं.रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाचा कार्यक्रम सभामंडपात होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम रात्री ८.३० वाजता होणार असून सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीपाद तुळशीबागवाले यांनी केले आहे.