fbpx
Friday, December 8, 2023
Latest NewsPUNE

ज्या कवितेत अंत:स्वर उमटायला लागतात तीच खरी कविता : भारत सासणे

पुणे : कवीची व्याकुळावस्था ही कविता निर्मितीची पहिली अट आहे. मनाचा दुर्मिळ, अनुपम अशा अवस्थेचा आविष्कार म्हणजे कविता. कवीला प्रामुख्याने व्याकुळावस्था, अनुनय-उपासना, साफल्य अशा तीन अवस्थांमधून जावे लागते. कवीला व्याकुळावस्था वेढून टाकत असते आणि त्याच अवस्थेतून कवितेचा जन्म होत असतो. ज्या कवितेत अंत:स्वर उमटायला लागतात तीच खरी कविता असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कथाकार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी केले.

रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे काव्य संग्रहास किंवा कवितेच्या प्रांतात योगदान देणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी काव्य प्रतिभा पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार प्रसिद्ध कवी, लेखक, प्रकाशक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष राजीव बर्वे यांना आज (दि. 15) सासणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. शाल, श्रीफळ आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पत्रकार भवन, नवी पेठ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ संपादक भानू काळे, रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमादे आडकर, ज्येष्ठ कवी उद्धव कानडे व्यासपीठावर होते.

कवीच्या निरागस मनोअवस्थेतल्या प्रेम नावाच्या अमूर्त संकल्पनेकडे हा कवी झुकू लागला आहे, असे बर्वे यांच्या काव्य लिखाणाविषयी सांगून सासणे म्हणाले, कविता ही अथांग आहे त्याबद्दल कितीही बोलले तरी कमी पडेल. स्वप्न आणि सत्य यातील परक कळत नाही तेव्हा कवी एक अनोखा प्रयोग करीत असतो. कालांतराने विचार परिपक्व व्हायला लागतात त्यानंतर उपासना प्रकट व्हायला लागते. ही उपासना अमूर्त तत्त्वाची असते.
भानू काळे म्हणाले, आज वाचक साहित्यापासून दूर जात असताना आक्रस्ताळ्या किंवा दुर्बोध अशा कवितांना महत्व दिले जाणे हा वाचकाच्या अभिरुचीच्या खोलीचा मापदंड बनतो आहे का असा प्रश्न पडतो. मोबाईल संस्कृती ही वाचन संस्कृतीला मारक ठरते आहे, त्याच बरोबरीने लेखकाला पुस्तक प्रकाशनाची झालेली घाई ही साहित्य निर्मितीला मारक ठरत आहे. या मुळे वाचक वाचनसन्मुख होण्याऐवजी वाचनविन्मुख होत आहे.

सुधीर मोघे यांच्या स्मृतीदिनी पुरस्कार मिळाल्याचा आनंद असल्याचे सांगून सत्काराला उत्तर देताना राजीव बर्वे म्हणाले, सुरुवातीच्या काळात स्वत:च्या सुखासाठी, आनंदासाठी कविता केल्या. एकटेपणाच्या टोचणीत कुठेतरी मन रिझवले जावे म्हणून काव्यलिखाणाकडे वळलो. कमीतकमी शब्दात जास्तीत जास्त आशय लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कविता एक उत्तम माध्यम आहे. लेखक परकाया प्रवेश करू शकतो, ही उक्ती कविंसाठी जरा जास्तच योग्य आहे. स्वत:ला व्यक्त करण्याकरिता कवितेइतके चांगले माध्यम नाही. उपस्थितांच्या आग्रहाखातर बर्वे यांनी दोन प्रेमकविता सादर केल्या.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. मानपत्र लेखन आणि वाचन उद्धव कानडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.

Leave a Reply

%d