fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTLatest News

नागराज मंजुळेच्या ‘घर बंदूक बिरयानी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

सध्या जोरदार चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’. मुळात नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके चित्रपट दिले आहेत. एका सर्वसाधारण विषयाला अनन्यसाधारण बनवणे, ही यांची खासियत आहे. हीच खासियत जपत आता लवकरच हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी‘ प्रदर्शित होणार आहे. यापूर्वीच या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले. टीझरने या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली आणि ही उत्सुकता शिगेला पोहोचवण्यासाठी आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर झळकला आहे. यात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील याच्या प्रमुख भूमिका आहेत.

आशेच्या भांगेची नशा भारी अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पोलीस, डाकू यांच्यात चकमक होताना दिसत आहे. यात एका तरुणाचाही सहभाग दिसत आहे. आता यांच्यात नक्की कशावरून ही चकमक सुरु आहे आणि घर, बंदूक आणि बिरयानीचा याच्याशी नेमका काय संबंध, याचे उत्तर प्रेक्षकांना ७ एप्रिल रोजी मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे आपल्याला ॲक्शन मोडमध्ये आणि एका वेगळ्याच शैलीत दिसत आहेत तर सयाजी शिंदेही अतिशय रावडी आणि तडफदार अंदाजात दिसत आहे. आकाशची रोमँटिक इमेजही तरुणांना भावणारी आहे. ट्रेलरमधील लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी म्हणजे पार्श्वसंगीत आणि अभूतपूर्व ॲक्शन. ट्रेलरवरून हा एक ॲक्शन चित्रपट असल्याचे कळत असले तरी यात कौटुंबिक कथाही दडली आहे. यात प्रेमकहाणीही बहरत आहे. नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटातील गाणी. ही गाणी भन्नाट लोकप्रिय होतात. या चित्रपटातील तीन गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली असून या गाण्यांनीही अल्पावधीतच धुमाकूळ घातला आहे.लाखोंच्या वर व्ह्यूज मिळालेल्या या गाण्यांना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यास यश मिळाले आहे. वैभव देशमुख यांचे बोल लाभलेल्या या गाण्यांना ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.

चित्रपटाबद्दल निर्माते नागराज पोपटराव मंजुळे म्हणतात, ”अतिशय भव्य स्वरूपात हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. दिसताना खूप ओळखीचा विषय दिसत असला तरी याची कथा खूप वेगळी आहे. मी पडद्यामागे आणि पडद्यावरही काम केले आहे. अनेकांना प्रश्न होता की या चित्रपटाचे नाव असे काय? तर या चित्रपटाचे नाव अतिशय समर्पक असून ते चित्रपट पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळेल. यात काही मुरलेले कलाकार आहेत काही नवोदित आहेत मात्र सगळ्याच कलाकारांनी जीव ओतून काम केले आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading