fbpx

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील जाचक अटी रद्द करा ; मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपसभापतींना साकडे

मुंबई : १ ऑगस्ट २०१९ पासून महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेतील जाचक अटींमुळे पंढरीनाथ सावंत यांच्या सारखे अनेक ज्येष्ठ पत्रकार या योजनेपासून वंचित राहिले आहेत. या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे शिष्टमंडळ नेऊन तसेच स्वतंत्र निवेदने देऊन केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात तातडीने संबंधितांची बैठक घेऊन ज्येष्ठ पत्रकारांना दिलासा द्यावा, असे साकडेही या शिष्टमंडळाने घातले आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे  प्रवीण पुरो यांच्या नेतृत्वाखाली संघाच्या कार्यकारिणीचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या दालनात भेटले आणि त्यांच्या कडे आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील जाचक अटी रद्द करा व ज्येष्ठ पत्रकारांना दिलासा मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने संदर्भात या शिष्टमंडळाने चर्चा केली. पत्रकारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी या योजनेच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना राबविण्यात येते. या योजनेतील लाभार्थी पत्रकारांना पात्रतेसाठी लावण्यात आलेले निकष जाचक असल्याने अनेक ज्येष्ठ पत्रकारांना या योजनेपासून वंचित राहावे लागले आहे.

या जाचक निकषांमुळे महाराष्ट्र शासनाने लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलेले पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या सह चंद्रकांत सावंत, नागेश केसरी, योगेश त्रिवेदी, अनंत मोरे, माधव कदम, प्रभाकर राणे अशा अनेक ज्येष्ठ गरजू पत्रकारांना या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. विश्वस्त मंडळाने सुचविलेल्या अटी व शर्तींमध्ये बदल अपेक्षित आहेत. हे बदल झाल्यास ज्येष्ठ गरजू पत्रकारांना या योजनेचा लाभ घेता येईल. या संदर्भात संबंधितांची आपल्या दालनात तातडीने बैठक बोलावून योग्य निर्णय व्हावा अशी विनंती शिष्टमंडळाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपसभापतींना केली आहे. शिष्टमंडळात अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष महेश पवार, कार्यवाह प्रवीण पुरो, कार्यकारिणी सदस्य कमलाकर वाणी, खंडुराज गायकवाड, भगवान परब आदींचा समावेश होता.

Leave a Reply

%d bloggers like this: