fbpx

स्थानिक कलावंतांसाठी चित्रपट प्रशिक्षणाचे दालन उघडणार – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. जल, जंगल, जमीन, निसर्ग आदी बाबींनी पूर्व विदर्भ सुजलाम सुफलाम आहे. यापूर्वी काही चित्रपटांचे चित्रीकरण पूर्व विदर्भात झाले आहे. वाघांच्या अधिवासावर आधारित टेरिटरी हा चित्रपट तर चंद्रपूरच्या स्थानिक कलावंतांनीच तयार केला आहे. याच प्रतिभेला समोर नेण्यासाठी व स्थानिक कलावंतांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी चित्रपट प्रशिक्षणाचे दालन उघडे करणार, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

चंद्रपुरातील मिराज सिनेमा येथे पहिल्या चंद्रपूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेसी, पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे सीईओ डॉ. जब्बार पटेल, सपना मुनगंटीवार प्रकाश धारणे, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे माजी अधिष्ठाता प्रो. समर नखाते आदी उपस्थित होते.

पूर्व विदर्भात कलेची कुठेही कमतरता नाही, असे सांगून सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार म्हणाले, स्थानिक कलावंतांना अभिनय व चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यांच्या प्रशिक्षण संस्थेत येथील प्रतिभावंत कलावंतांना पाठविण्याचा आपला मानस आहे. आपल्या जिल्ह्यातील तरुण-तरुणीही चित्रपट सृष्टीत येऊन जिल्ह्याचा नावलौकिक करू शकतात, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. मुंबई चित्रपट नगरी ही जगातील सर्वात सुंदर इंडस्ट्रीज होऊ शकते. कारण बाजूलाच 104 किलोमीटर परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व तेथील जैवविविधता चित्रपट निर्मितीचे प्रमुख आकर्षण आहे.

दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल म्हणाले, सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या पुढाकारामुळेच चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे पहिल्यांदाच आयोजन होत आहे. हा फिल्म फेस्टिवल महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा अधिकृत उपक्रम आहे. या विभागाला नवीन चेहरा देण्याचे काम मुनगंटीवार यांनी केले आहे. गत 20 वर्षापासून आपण या फिल्म फेस्टिवलचे आयोजन करीत असतो. मात्र आता पुण्याच्या बाहेर मुंबई, चंद्रपूर, नागपूर आणि लातूरमध्येही आयोजन होणार आहे. या आयोजनामुळे चंद्रपूरला चित्रपटसृष्टीचे एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: