fbpx

आदिवासींना वनवासी बोलणे हा आदिवासींचा अपमान आहे – शरद पवार

मुंबई  – आज या देशात आणि राज्यात आदिवासींची संख्या मोठी आहे. त्यांना अजूनही ख-या अर्थाने जीवन जगण्याची अपेक्षा आहे. ती स्थिती अद्यापही पूर्णत्वाला गेली असा निष्कर्ष काढता येत नाही. काही लोक त्यांना वनवासी म्हणतात. वनवासी म्हणणं एकप्रकारे आदिवासींचा अपमान आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. ते आदिवासीच आहेत. जल, जंगल आणि जमीन इथे ते खरे मालक आहेत असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे कार्यक्रम पार पडला. सन २०२२ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रख्यात उद्योगपती, व्यापारी आणि शिक्षण क्षेत्रात अग्रणी असणारे दानशूर, परोपकारी अझीम प्रेमजी यांना प्रदान करण्यात आला. 

आज जंगल आणि त्यासंबंधीचा जो संघर्ष होतो. ज्याचा उल्लेख प्रतिभाताईनी आपल्या भाषणात केला. आज खरंच संघर्ष करण्यासाठी जे वरती येतात त्यांचा आदिवासींसंबधी त्यांचे ज्ञान आहे ते ज्ञान एकादृष्टीने अज्ञानच आहे अशाप्रकारची प्रचिती देतात असे स्पष्ट करतानाच आजही या देशातील, राज्यातील वनसंपत्ती जी राहिली ती आदिवासींनी सांभाळलेली आहे हा खरा त्यांचा अधिकार आहे. ते त्यांचे कर्तृत्व आहे असे शरद पवार यावेळी म्हणाले.

त्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी त्यांचे अधिकार जतन करण्यासाठी जे लोक प्रयत्नांची परीक्षा आणि वेळ प्रसंगी संघर्ष करतात त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणार्‍या लोकांच्या मालिकेमध्ये प्रतिभा शिंदे आणि त्यांचे सहकारी व्यासपीठावर आहेत ते पाहून शरद पवार यांनी मनापासून समाधान व्यक्त केले.

या आदिवासींच्या हिताची जपणूक करण्यासाठी विशेष लक्ष देऊन काम करण्याची आवश्यकता आहे. हे ध्यानात घेऊन आज ती जबाबदारी सगळ्या सहका-यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. मध्यंतरी वर्धा येथील सेवाग्राममध्ये आदिवासींमध्ये काम करणारे आदिवासी गावाचे गावप्रमुख यांचे एक संमेलन घेतले होते. शेकडो लोक व भगिनी होत्या. आपल्या गावाच्या हिताची जपणूक करण्यासाठी कष्ट करायला कुठलीही कमतरता नाही या गोष्टी पदोपदी त्या सांगत होत्या. आणि त्या रस्त्याने जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या पाठीशी ही सगळी शक्ती उभी आहे. त्यांच्या पाठीशी चव्हाणसेंटर उभे राहिल आणि उपेक्षित माणसाला साथ देईल अशी खात्री शरद पवार यांनी यावेळी दिली.

यावेळी शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपटच उलगडला.
संसदेत जातो त्यावेळी नवीन सदस्य संसदेत पाऊल टाकतो आणि लोकसभेच्या सभागृहात जातो त्या सभागृहाच्या दारासमोर एकच पुतळा आहे तो चव्हाणसाहेबांचा आहे. तो पुतळा हेच सांगतो की, सदनामध्ये तुम्ही जात आहात त्यावेळी संसदीय संस्थेची प्रतिष्ठा याच्यात कधी तडजोड करू नका. सुसंस्कृतपणा कधी सोडू नका. या देशातील सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी तुम्ही सदनामध्ये प्रवास करता आहात याची अखंड नोंद ठेवा. हा विचार त्या सदनामध्ये शिरलेल्या प्रत्येक व्यक्तीला येतो आणि त्याचा आनंद, अभिमान आम्हा सर्वांना आहे असेही शरद पवार म्हणाले.

नेहमीच त्यांच्या या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करत असतो. आज याठिकाणी प्रतिभा शिंदे आणि त्यांचे सहकारी यांची उपस्थिती आहे. चव्हाण सेंटरने आज नवीन विभाग सुरू केला आहे तो म्हणजे सायबर वेल्फेअर सेंटर सुरू केला त्याबद्दल आनंद व्यक्त केला.

निवड समितीने उत्तम व्यक्तीची निवड केली आहे. अझीम प्रेमजी, विज्ञानातील त्यांचे योगदान असेल किंवा धनसंपत्ती मिळाल्यानंतर ती समाजाच्या भल्यासाठी कशी वापरता येईल याची अखंड नोंद त्यांनी ठेवली अशा मालिकेमध्ये त्यांचा उल्लेख करावा लागेल. आनंद आहे खान्देशच्या सुपुत्राची निवड ही निवड समितीने केली आणि त्यांनी चव्हाणसेंटरचा सन्मान स्वीकारला त्याबद्दल आभार मानतानाच त्यांनी सन्मानाची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम केल्याबद्दल शरद पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Reply

%d bloggers like this: