fbpx

भारतीयाने भारतीयाचा खून करण्याच्या विरोधात सावरकर – शरद पोंक्षे

पुणे : वैचारिक मतभेद असले, तरी आपण भारतीय एक आहोत. समोरच्याने शस्त्र उचलल्यावर आपण अहिंसक होऊन चालणार नाही, त्यामुळे आपण नाईलाजाने शस्त्र उचलावे, असा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार होता. भारतीयाने भारतीयाचा खून करण्याच्या विरोधात सावरकर होते, त्यामुळे गांधी हत्येत सावरकर असणे शक्यच नाही आणि तसे न्यायालयात सिद्धही झाले आहे, असे ठाम मत ज्येष्ठ अभिनेते व सावरकरप्रेमी शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक), पुणे केंद्र युवा आघाडी तर्फे स्वा. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वा. सावरकर विचार दर्शन या शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन सदाशिव पेठेतील भरत नाटय मंदिर येथे करण्यात आले. यावेळी अ. ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.अविनाश भिडे, विश्वनाथ भालेराव, मकरंद माणकीकर, अनिल शिदोरे, सुभाष सबनीस, परेश मेहेंदळे, मोहना गद्रे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

शरद पोंक्षे म्हणाले, देशात हिंदू पेटून उठला, तर सावरकरांना माफीवीर म्हणण्याची हिंमत कोणालाही होणार नाही. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांना बदनाम करायचे आणि हिंदुत्वाची ताकद मोडण्याचे काम सध्या सुरु आहे. नरेंद्र मोदी हे रा. स्व. संघातील व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान असल्याची ही पोटदुखी आहे.

ते पुढे म्हणाले, स्वा. सावरकर हे हिंदू राष्ट्रवादी होते आणि ते कॉंग्रेसमध्ये गेले नाहीत, हाच त्यांचा गुन्हा होता. हिंदी राष्ट्रवादाचा बुरखा फाडणारे पहिले व्यक्तिमत्व सावरकर हे होते. वेद, पुराण, कुराण आणि बायबल हे वंदनीय व पूजनीय आहेत. पण काळानुसार अनुकरणीय आहेतच असे नाही, कारण ते काळानुरुप बदलत नाहीत. त्यामुळे विज्ञान हा धर्मग्रंथ हवा, असे सावरकरांचे मत होते.

जातीभेदाबद्दल बोलताना ते म्हणाले, देशात १८ पगड जातींमधील भेद हा हिंदू धर्माला शाप आहे. त्यामुळे जाती संपायला हव्यात, हा विचार मांडून त्याप्रमाणे सावरकरांनी सन १९२४ मध्ये काम केले. हिंदू राष्ट्रवाद हा देशाला तारणारा आहे. हिंदी राष्ट्रवादाऐवजी हिंदू राष्ट्रवाद आपण स्विकारला असता, तर स्वातंत्र्यानंतरची ७५ वर्षे लांगुलचालनाचा तमाशा बघायला लागला नसता, असेही पोंक्षे यांनी सांगितले. मानसी फडके यांनी सूत्रसंचालन केले. मोहना गद्रे यांनी प्रास्ताविक केले. परेश मेहेंदळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: