३२वी पीएसपीबी इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धा – तिसऱ्या फेरी अखेर एमआरपीएल आणि आयओसी-ए हे संघ पूल – १ मध्ये संयुक्त आघाडीवर तर पूल -२ मध्ये ओएनजीसी-ए संघाची आघाडी
पुणे : पुण्यात सुरू असलेल्या ३२ वी पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (पीएसपीबी) इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच्या तिसऱ्या फेरी अखेर पूल – १ मध्ये मेंगलोर रिफायनरी पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (एमआरपीएल) आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसी-ए) हे संघ प्रत्येकी ५ गुणांनी आघाडीवर आहेत. तर पूल -२मध्ये ऑईल अँड नॅचरल गॅस (ओएनजीसी-ए ) संघ ६ गुणांनी आघाडीवर आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल)च्या वतीने पीवायसी हिंदू जिमखाना येथे आयोजित या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी केदार जाधव आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पश्चिम विभागाचे मुख्य सरव्यवस्थापक अजित धाकरस यांनी बुद्धिबळाची एक – एक चाल खेळली. यावेळी पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड’चे उपसचिव जसजीत सिंग, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव, निरंजन गोडबोले, पुणे जिल्हा बुद्धिबळ मंडळाचे उपाध्यक्ष अश्विन त्रिमल, पीवायसी हिंदू जिमखानाचे सचिव सारंग लागू उपस्थित होते. कार्यक्रमात आयओसीएलचे मुख्य व्यवस्थापक (क्रीडा) ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांनी सर्व खेळाडू आणि मान्यवरांचे स्वागत केले, तर उपमहाव्यवस्थापक भालचंद्र जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले.
या बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम सांघिक सामने होणार असून त्यानंतर वैयक्तिक स्वरूपातील सामने होतील. सांघिक सामन्यात एकूण १५ संघ सहभागी झाले आहेत. त्यापैकी ए गटात ७ तर बी गटात ८ संघ यांचा समावेश आहे.
स्पर्धेत प्राथमिक स्तरावर ७ फेऱ्या होतील. यातून प्रत्येक गटातील २ संघ हे उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सामान्यांच्या तीन फेऱ्या पार पडल्या. यामध्ये तिसऱ्या फेरी अखेर एमआरपीएल आणि आयओसीए हे संघ पूल – १ मध्ये संयुक्त आघाडीवर तर पूल -२ मध्ये ओएनजीसी-ए संघ आघाडीवर आहेत.
यावेळी काही सामने लक्षवेधी ठरले. बीपीसीएल संघाच्या ग्रँड मास्टर एम आर व्यंकटेशने दुसऱ्या फेरीत फोर-नाइट्स ओपनिंगमध्ये ओएनजीसी-ए सघाच्या ग्रँड मास्टर कोनेरू हम्पीवर मात केली.
तिसऱ्या फेरीत ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंद याने निमझो-इंडियन बचाव प्रकारात आपल्या खेळास सुरवात केली होती. मात्र आंतरराष्ट्रीय मास्टर व्ही.एस.राहुलने यांनी या फेरीत त्यांचा आश्र्चर्यकारक पराभव केला. स्पर्धेत गुरुवारी होणाऱ्या चार फेऱ्यांमध्ये आणखी काही रोमांचक सामने पाहण्यास मिळणार आहेत.