Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पं रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने ९ व्या गानसरस्वती महोत्सवाचा समारोप

पुणे  : ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांचे सुपुत्र व गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे शिष्य पं रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने आज ९ व्या गानसरस्वती महोत्सवाचा समारोप झाला. डी पी रस्त्यावरील केशवबाग या ठिकाणी शनिवार (४ मार्च) व रविवार (५ मार्च) दरम्यान तीन सत्रांत नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त दाजीशास्त्री पणशीकर, किशोरी आमोणकर यांचे सुपुत्र निहार आणि बिभास आमोणकर, महोत्सवाचे आयोजक पं रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर आदी यावेळी उपस्थित होते.

महोत्वाच्या तिसऱ्या सत्राच्या पूर्वार्धात गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या बंगळूरूस्थित शिष्या विदुषी संगीता कट्टी यांनी आपले गायन सादर केले. त्यांनी राग भीमपलासने आपल्या गायनाला सुरुवात केली.

आज मला गानसरस्वती महोत्सवात माझे गाणे सादर करायची संधी मिळत आहे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असून आजचा दिवस महत्त्वाचा आहे, असे सांगत संगीता कट्टी म्हणाल्या, ” मी चार वर्षांची असताना माझ्या वडिलांचे कलेक्शन पहायला नौशाद साहेब आमच्या घरी धारवाडला आले होते. यावेळी त्यांनी मला गाणं म्हणायला सांगितलं, मी चांगली गाते असं कोणीतरी त्यांना सांगितलं असावं. यावेळी मी नूरजहाँ यांची ‘आवाज दे कहां हैं’ गायलं, त्यावेळी नौशाद साहेबांनी माझ्या वडिलांना सांगितले या मुलीला चांगल्या गुरूंकडे शास्त्रीय संगीताची तालीम द्या, पुढे जाऊन ही देशासाठी नक्की काहीतरी करेल. त्याप्रमाणे माझे सांगीतिक शिक्षण पुढे सुरू झाले. पण नौशाद साहेबांमुळे मला माझी सांगीतिक वाट दिसली. त्याबद्दल मी कायमच त्यांची ऋणी आहे.”

संगीता कट्टी यांनी राग भीमपलासमध्ये ‘ रे बिरहा…’ ही पारंपरिक विलंबित तीन तालातील आणि ‘ रंग सो रंग मिलायें…’ ही किशोरीताईंची एकतालातील
बंदिश प्रस्तुत केली. ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल…’ या अभंगाने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), अश्विनी पुरोहित, श्रीनिधी देशपांडे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

यानंतर पद्मश्री शुभा मुदगल यांचे गायन झाले. आमच्या सर्वांच्या श्रद्धेय आणि सिद्ध गायिका किशोरीताई आमोणकर यांच्या नावाने सुरू असलेल्या या महोत्सवात मला गायची संधी दिली त्याबद्दल मी रघुनंदन पणशीकर यांची आभारी आहे असे सांगत शुभा मुदगल यांनी राग पुरीया धनाश्रीने आपल्या गायनाला सुरुवात केली.

पूरीया धनाश्रीमध्ये त्यांनी ‘बल बल जाऊं…’ ही बंदिश आणि ‘ देखी तोरी आन बान… ‘ ही द्रुत एकताल मधील रचना प्रस्तुत केली. ‘लाल की होली खेलन आओं री ..’ या रचनेने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना अनिष प्रधान (तबला), सुधीर नायक (संवादिनी),
कोमल गुरव, श्वेता देशपांडे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

त्यानंतर फारुखाबाद घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक अनिन्दो चॅटर्जी यांचे एकल तबलावादन झाले. त्यांनी रूपक तालात काही रचना सादर केल्या. यांनतर त्यांनी आपल्या गुरूंच्या तीनतालातील रचना प्रस्तुत केल्या. याबरोबरच फारुखाबाद घराण्याच्या रचना व काही जुन्या गत त्यांनी वाजविल्या. त्यांना फारुख लतीफ खान यांनी सारंगीची साथ केली.

यानंतर पं रघुनंदन पणशीकर यांचे गायन झाले. त्यांनी संपूर्ण मालकंसने आपल्या गायनाला सुरुवात केली. राग मालकंसमध्ये त्यांनी ‘ बरज रही… ‘, ‘बनवारी श्याम मोरे…’ या रचना प्रस्तुत केल्या. यानंतर त्यांनी राग मालीगौरा मध्ये ‘दरस सरस…’ ही बंदिश सादर केली. यांनतर त्यांनी ‘ ए री नींद न आयें… ‘ ही राग रायसा कानडा मधील बंदिश सादर केली. उपस्थितांच्या आग्रहाखातर त्यांनी ‘ बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ हा अभंग सादर केला. ‘ अवघा रंग एक झाला, रंग रंगला श्रीरंग..’ या भैरवीने त्यांनी आपल्या गायनाचा आणि ९ व्या गानसरस्वती महोत्सवाचा समारोप केला.

त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), सौरभ काडगावकर, अश्विनी पुरोहित, राधिका जोशी, शुभम खंडाळकर, विनय रामदासे यांनी स्वरसाथ व तानपुरासाथ केली. विघ्नेश जोशी यांनी संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading