fbpx

पं मुकुल शिवपुत्र यांच्या गायनाने गानसरस्वती महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता

पुणे   : पं कुमार गंधर्व यांचे सुपुत्र व शिष्य पं मुकुल शिवपुत्र यांच्या गायनाने गानसरस्वती महोत्सवाच्या ( Ganasaraswati festival) पहिल्या दिवसाचा समारोप झाला. यावेळी मुकुल शिवपुत्र यांना ऐकायला रसिक प्रेक्षकांनी गर्दी केली होती.

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या गानसरस्वती महोत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवसाचा समारोप पं मुकुल शिवपुत्र यांच्या गायनाने झाला. त्या आधी पं रूपक कुलकर्णी यांच्या बहारदार बासरीवादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

महोत्सवाचे हे ९ वे वर्ष असून राजाराम पुलाजवळील डी पी रस्ता येथील केशवबाग या ठिकाणी महोत्सव संपन्न होत आहे. किशोरी आमोणकर यांचे सुपुत्र निहार आणि बिभास आमोणकर, महोत्सवाचे आयोजक पं रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, जाई काजळचे राजेश गाडगीळ, फ्लीटगार्ड फिल्ट्रमचे निरंजन किर्लोस्कर आणि बेलवलकर हाउसिंगचे अजित बेलवलकर आदी यावेळी उपस्थित होते.

मुकुल शिवपुत्र यांनी राग शुद्ध कल्याणने आपल्या गायनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी विलंबित एक तालात ‘ बोल न लागी…’ ही रचना प्रस्तुत केली. यानंतर त्यांनी द्रुत तीन ताल मध्ये दिल दा मलिक साई…’ ही रचना प्रस्तुत केली. यांनतर त्यांनी राग बसंत मध्ये ‘ का करहु रघु ही’ मध्यलय तीन तालातील रचना प्रस्तुत केली.

चित्रपट सृष्टीमध्ये स्क्रीन असतो आणि सांगीतिक बैठकांमध्ये स्क्रीन नसतो हा मूलभूत फरक आहे असे सांगत मुकुल शिवपुत्र म्हणाले, “समोर प्रेक्षकांना देखील कलाकाराचे संगीत आवडत आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. म्हणून लाईट कलाकाराच्या चेहऱ्यावर नाही तर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर देखील हवा.”

यांनतर त्यांनी ‘छांड दे गल बाही…’ ही भैरवी प्रस्तुत केली. त्यांना सुनील जायफळकर (तबला), राहुल गोळे (संवादिनी), पल्लवी पोटे आणि आदीश्री पोटे (तानपुरा) यांनी साथसंगत केली

या आधी पं रूपक कुलकर्णी यांनी रागांचा राजा समजल्या जाणाऱ्या राग यमनने आपल्या बासरी वादनाला सुरुवात केली. माझे कुटुंबीय व आमोणकर कुटुंबीय हे राघवेंद्र स्वामी यांचे भक्त असल्याने आमची चांगली ओळख होती. मी जेव्हा कोणत्या कार्यक्रमामध्ये सादरीकरण करीत असतो तेव्हा सर्वांत प्रथम डोळे मिटून कायमच किशोरीताई यांचे स्मरण करतो असे कुलकर्णी यांनी सांगितले. राग मांझ खमाजच्या प्रस्तुतीने त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये त्यांनी अद्धा तीनताल आणि द्रुत तीनतालचे सादरीकरण केले. त्यांना हिंडोले मुजुमदार यांनी समर्पक तबलासाथ केली. याबरोबरच जयकिशन हिंगो व आदित्य सुतार यांनी बासरीसाथ तर शुभम खंडाळकर याने तानपुरा साथ केली.

महोत्सवाच्या उद्याच्या दुसऱ्या दिवशीचे (रविवार, ५ मार्च) सकाळचे सत्र सकाळी ७ वाजता सुरु होईल. यावेळी संगीतमार्तंड पं जसराज यांचे शिष्य व मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं संजीव अभ्यंकर यांचे गायन तर इमदादखानी घराण्याचे जग प्रसिद्ध सतार वादक पं बुधादित्य मुखर्जी यांचे सतारवादन होईल.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचे संध्याकाळाचे सत्र रविवार ५, मार्च सायं ४ वाजता संपन्न होईल यामध्ये गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या बंगळूरूस्थित शिष्या विदुषी संगीता कट्टी यांचे गायन, प्रसिद्ध गायिका पद्मश्री शुभा मुदगल यांचे गायन, फारुखाबाद घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक अनिंदो चॅटर्जी यांचे एकल तबलावादन होईल. ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांचे सुपुत्र व गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे शिष्य पं रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने ९ व्या गानसरस्वती महोत्सवाचा समारोप होईल.

विघ्नेश जोशी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: