Monday, June 22, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

उपमुख्यमंत्री फडणवीस यांना धक्का; कसब्यात काँग्रेसचे धंगेकर विजयी

पुणे : भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झालाआहे. या निवडणुकीत भाजपाचे  नेते आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, कसब्यातील अपयशामुळे फडणवीस  यांना नामुष्कीचा सामना करावा लागणार आहे. गेल्या महिन्याभरापासून राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये महीविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती.

सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची करण्यात आली होती. दोन्ही बाजूचे दिग्गज नेते, मंत्री, आमदार, खासदार या मतदारसंघांमध्ये ठाण मांडून बसले होते.

या निवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळावी, अशी मागणी होत होती. मात्र, पक्षाने रासने यांना पसंती दिली.  यापूर्वी भाजपाच्या सत्ताकाळात महापालिकेतील महत्त्वाचे स्थायी समिती सभापतीपद सलग तीन वर्षे देण्यात आले होते. त्यानंतर आता विधानसभेच्या तिकीटासाठीही पाटील यांनी त्यांच्या नावाला समर्थन दिले. त्यामुळे भाजपातील एक गट नाराज होता.  गेल्या 28 वर्षांपासून भाजपच्या हातात असलेलाा कसबा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. रवींद्र धंगेकरांनी भाजपवर मोठा विजय मिळवला आहे.

काँग्रेसने भाजपचा बालेकिल्ला हिसकावला आहे. तब्बल 28 वर्षांनंतर कसब्यामध्ये आमदारकी भाजपकडून काँग्रेसकडे आली आहे. याआधी 1992 च्या निवडणुकीत कसब्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. 2009 मध्येही कसब्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी गिरीश बापट यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना विजय मिळवण्यात अपयश आलं. यंदाच्या निवडणुकीत भाजपविरोधी असणारी नाराजी रवींद्र धंगेकरांच्या पथ्यावर पडल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

दरम्यान, भाजपाचे उमेदवार हेमंत रासणे म्हणाले की, २००९ पासून हा मतदारसंघ संमिश्र झाला. त्यानंतर भाजपाने तो तीनदा जिंकला असला, तरी त्या प्रत्येक वेळी किमान तिरंगी लढत होती. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर पहिल्यांदा इथे थेट लढत झाली. त्यामध्ये आमचं हक्काचं मतदान कमी झालं आणि विरोधी पक्षाचं हक्काचं मतदान जास्त प्रमाणात झालं असं वाटतं. कार्यकर्त्यांशी, त्या भागातल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करता येईल. मी घरोघरी जाऊ शकत नव्हतो, पण आमची यंत्रमा घरोघरी गेली होती. आमच्या अपेक्षेप्रमाणे हे घडलेलं नाही. नाराजीचा फार फरक पडला असं मला वाटत नाही. मी कुठेतरी कमी पडलो असं मला वाटतं. मला यावर थोडं चिंतन करावं लागेल. माझ्या दृष्टीने हा निकाल धक्कादायक आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading