fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

लोक न बोलता जिथं बटण दाबायचं तिथे दाबतात – अजित पवार

मुंबई :  भाजपने ज्या प्रकारे लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांना मतदान करायला घेऊन आले. ज्याप्रकारे गिरीश बापट संसदेचं अधिवेशन चालू असताना जाऊ शकले नाही. ते विश्रांती घेत होते. तरीही त्यांना कशाप्रकारे बाहेर यायला सांगितलं आणि मेळावा घ्यायला सागितलं हे बरोबर नाही. तुमचे उमेदवार जिंकण्यासाठी दुसऱ्याच्या आरोग्याचाही विचार करणार नाही का? हे लोकांना पटत नाही. मग लोक न बोलता जिथं बटण दाबायचं तिथे दाबतात”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये महीविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा मोठा विजय झाला आहे. या निकालावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर टीका केली.  

“मुख्यमंत्र्यांनी कसब्यामध्ये रोडशो केला. राज्याचा मुख्यमंत्री कधी रोड शो करतो का? मी असं म्हटलं तर ते म्हणाले मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे. सर्वसामान्यांना भेटणार. आता सर्वसामान्यांना भेटूनही सर्वसामान्यांनी पराभव केला हे लक्षात घ्या”, असं म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टिकास्त्र सोडले. 

“राहुल कलाटे आणि नाना काटेंची मतं एकत्र केली, तर ती भाजपच्या उमेदवारापेक्षा जास्त आहेत. याचा अर्थ, पुढच्या निवडणुकीत आमच्यामध्ये बंडखोरी होता कामा नयेत, ही काळजी घेणं गरजेचं आहे”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

“जर जागावाटप योग्य प्रकारे झालं, तर महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, हेच या दोन पोटनिवडणुकांच्या निमित्ताने आणि मिळालेल्या मतांच्या निमित्ताने समोर आलं आहे. जनता जेव्हा ठरवते, तेव्हा सहानुभूतीचाही विचार करत नाही, हे मागे पंढरपूर निवडणुकीतही दिसलं, आता कसब्यातही दिसलं. चिंचवडमध्येही त्याची पुनरावृत्ती झाली असती”, असं म्हणत अजित पवारांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.

“जरी भावनिक मुद्दा होता, तरी सहानुभूतीचा मुद्दा पुढे येणार नाही, महागाई-बेरोजगारी, शिवसेनेचं चिन्ह काढून घेतलं त्या भावना मतदारांमध्ये होत्या. शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांमध्ये तशा भावना होत्या”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

“चिंचवडमध्ये अशीच पुनरावृत्ती झाली असती. पण आम्हाला ज्यांनी तिकिटं मागितली, ते दोघंही तिथे उभे राहिले. मी राहुल कलाटेंना समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यानी माझ्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही, उभा राहिला. मग त्याचा फॉर्म निघू नये, यासाठीही फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आला. त्याला सहकार्य कसं करता येईल, हेही सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलं”, असंही अजित पवारांनी सांगितलं आहे.

“निवडणूक जिंकण्यासाठी ज्या ज्या बाबी वापरल्या जातात, त्या सगळ्या भाजपनं कसब्यात केल्या. रवींद्र आणि त्यांच्या पत्नीने मतदानाच्या आदल्या दिवशी आंदोलनही केलं होतं. सर्व गोष्टींचा वापर करूनही तिथे अनेक वर्षांची जागा मविआनं खेचून आणली आहे. महाराष्ट्राला वेगळा संदेश देण्याचं काम झालं आहे” असं म्हणत अजित पवारांनी कसब्याच्या निकालावर भाष्य केलं. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading