Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

दयानंद घोटकर लिखित ‘वाचा आणि नाचा’, ‘मित्र आणि चित्र’ बालकविता संग्रहांचे प्रकाशन

पुणे : बालकांच्या भावविश्वातील निसर्ग, संगीत, प्राणी-पक्षी हे विषय बालकविता संग्रहाच्या माध्यमातून सोप्या, सुंदर आणि नादमधूर शब्दात मांडण्यात आले असल्याने ते मुलांना भावतील, असे प्रतिपादन कवयित्री आश्लेषा महाजन यांनी केले.
कवी दयानंद घोटकर लिखित ‘वाचा आणि नाचा’ या बालकवितांच्या संग्रहाचे प्रकाशन महाजन यांच्या हस्ते तर ‘मित्र आणि चित्र’ या बालकवितांच्या संग्रहाचे प्रकाशन सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई यांच्या हस्ते विद्या विकास प्रशाला येथे झाले. त्या प्रसंगी महाजन बोलत होत्या. दिलीपराज प्रकाशनने ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. दोन्ही पुस्तकांना प्रसिद्ध कवयित्री संगीता बर्वे यांची प्रस्तावना आहे.
प्रसिद्ध उद्योगपती, श्यामची आई फाउंडेशनचे अध्यक्ष भारत देसडला, सुलेखन तज्ज्ञ श्रीराम वैद्य, विद्या विकास प्रशालेचे संचालक विनायक जांभोरकर, विश्वस्त अशोक जांभोरकर, मुख्याध्यापिका उर्मिला बामणे आदी उपस्थित होते.
पुस्तकांच्या माध्यमातून मूल्यशिक्षण आणि सकारात्मकता मिळत असल्याचे मुख्याध्यापिका भारती जोगी यांनी सांगितले. संतोष घोंगडे यांनी रेखाटलेल्या चित्रांचे त्यांनी कौतुक केले. पुस्तकरूपी भेट मुलांना निश्चितच आवडेल असे मत डॉ. मिलिंद भोई यांनी व्यक्त केले.
विद्या विकास प्रशालेतील विद्यार्थी आणि कवी दयानंद घोटकर यांनी दोन्ही काव्यसंग्रहातील काही कवितांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वरी तांबे यांनी केले तर आभार प्राची घोटकर यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading