श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख अक्षय अशोक गोडसे यांच्या ‘पाठींबा’ क्लिपमुळे उलट सुलट चर्चा
पुणे – पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख आणि या ट्रस्टचे संस्थापक दिवंगत तात्या गोडसे यांचे नातू अक्षय अशोक गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठींबा दिल्याने भाजपच्या गोटामध्ये हल्लकल्लोळ उडाला. गोडसे यांच्या पाठींच्या क्लीप व्हायरल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच गोडसे यांची महायुतीचे उमेदवार आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सरचिटणीस यांना पाठींबा असल्याची क्लीप व्हायरल करण्यात आली. कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार अटीतटीवर आला असताना ‘गोडसे’ यांच्या ‘पाठींबा’ नाट्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांची दुपारी एक क्लीप व्हायरल झाली. त्यामध्ये गोडसे कुटुंबियांचे धंगेकर यांच्यासोबत कौटुंबिक संबध आहेत. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तात्या गोडसे यांच्या प्रत्येक वाढदिवशी धंगेकर अगदी आमच्या घरापुढे रांगोळ्यांच्या पायघड्या घालून तात्यांचा वाढदिवस उत्साहात साजरे करायचे. आमचे कुटुंबिय कॉंग्रेस समर्थक असून आम्ही कुटुंबिय महाआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी आहोत, असे त्या क्लीपमध्ये म्हंटले आहे. ही क्लिप अवघ्या काही वेळामध्ये वार्यासारखी पसरली. हा भाजपचे उमेदवार आणि प्रामुख्याने ट्रस्टचे सरचिटणीस असलेल्या हेमंत रासने यांना मोठा धक्का होता. एकिकडे अन्य मंडळांचा पाठींबा मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असताना आपल्याच ट्रस्टमधून विरोधी उमेदवाराला पाठींबा दिल्याने भाजपमध्ये हल्लकल्लोळ उडाला.
दरम्यान, अवघ्या काही तासांतच अक्षय गोडसे यांची आपला पाठींबा हेमंत रासने यांनाच असून मी त्यांच्या प्रचारात असल्याचे वक्तव्य असल्याची क्लिप व्हायरल झाली. मात्र, अगोदरच्या क्लिपबद्दल त्यांनी कुठल्याही पद्धतीने खुलासा करण्याचे टाळले. त्यामुळे गोडसे यांचा मनापासून पाठींबा नेमका कोणाला? याबाबत आता राजकिय वर्तुळासोबतच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
