नदी काठ सुधार प्रकल्प राबवताना काही निर्णय घ्यावे लागतील : आमदार माधुरी मिसाळ
पुणे : नदी पात्रात रस्ता करण्यास विरोध झाला होता. आता नदी काठ सुधार योजनेमुळे तो बंद होणार असून त्याला विरोध करणे योग्य नाही. विकास करताना काही निर्णय घ्यावे लागतील, असे स्पष्टीकरण भाजपच्या कसबा निवडणूक निरीक्षक आमदार माधुरी मिसाळ यांनी केले.
भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय, कुणाल टिळक उपस्थित होते. रासने यांच्या कार्य अहवालामध्ये नदी काठ सुधार योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे. या योजनेच्या विकास आराखड्यामध्ये नदी काठाला तटबंदी करून नदीत बारमाही पाणी आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. हे करत असताना नदी पात्रातील रस्ता बंद होणार असून भिडे पूल, टिळक पूल वाहतुकीसाठी बंद होणार आहेत. याचा सर्वाधिक फटका कसब्यातील नदी काठच्या नागरिकांना बसणार आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत विचारणा केली.
यावर स्पष्टीकरण देताना आमदार मिसाळ म्हणाल्या, मोठे प्रकल्प करताना काही निर्णय घ्यावे लागतात. नदी पात्रात रस्ता करताना विरोध झाला होता. तो बंद करू नये म्हणून आता विरोध करणे योग्य नाही. या ठिकाणी वाहनांचे पार्किंग अधिकृत नाही.
दरम्यान, केशव उपाध्ये म्हणाले, हिंदुत्ववादी कसब्यात काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना प्रचारात यावे लागते तेथेच काँग्रेस उमेदवाराचा पराभव निश्चित आहे. अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघडी सरकारने पुणे शहराला 25 वर्षे मागे नेले आहे. हिंदुत्ववादी कसब्याचा विकास करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे.
