Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

चिंचवड विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२३ च्या अनुषंगाने मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या निवडणूक साहित्याचे वाटप मतदान दिवसाच्या आदल्या दिवशी २५ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असून या कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आज कामकाजासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले.

प्रारंभी, निवडणूक निरिक्षक एस. सत्यनारायण यांच्या उपस्थितीत सेक्टर अधिकारी आणि संगणक चालक यांना निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी प्रशिक्षण दिले. मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि आवश्यक कामकाज याबद्दल या प्रशिक्षणामध्ये सविस्तर माहिती आणि सूचना देण्यात आल्या. यानंतर साहित्य स्वीकृती आणि वाटप कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कामकाजासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले.

साहित्य वाटप आणि स्वीकृतीचे काम थेरगाव येथील शंकरआण्णा गावडे कामगार भवन येथे पार पडणार आहे. साहित्य वाटप करण्याकरीता १११ कर्मचारी तर स्वीकृतीसाठी १४८ कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटप आणि स्वीकृतीचे काम सोपविण्यात आले आहे.

साहित्य वाटप व स्वीकृती कामकाज खूप जबाबदारीचे आणि काळजीपूर्वक करण्याचे काम आहे. प्रत्यक्ष निवडणूकीतील मतदानाच्या कामकाजामधील हा महत्वपूर्ण टप्पा असून ह्या कामात चूक झाल्यास संपूर्ण यंत्रणा विस्कळीत होऊ शकते. सर्व कामकाज व्यवस्थित पार पाडण्यासाठी, नियंत्रण पथक नियुक्त केली आहे. या कामकाजामध्ये हलगर्जीपणा न करता सर्वांनी समन्वयाने काम करावे,अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.

मतदानाच्या आदल्या दिवशी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेपासून साहित्य वाटप कामकाजाला सुरुवात होणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपासून साहित्य स्वीकृतीच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading