Thursday, November 19, 2026
Latest NewsMAHARASHTRA

प्रेमी युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, तरुणाचा मृत्यू

अकोला :  जिल्ह्यातील उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणात उरळ पोलिसांनी एका युवकाविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. रविवारी दुपारी प्रेमी युगुलाने उरळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांनाही अकोल्याच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. स्टेशनमधील पीएसआयच्या दबावामुळे भावाने आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या भावाने केला आहे.

अकोला जिल्ह्यातील सांगवी खुर्द येथील अतुल संजय वायधने (२३) याचं बाळापूर तालुक्यातील एका  १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबध होते. ही बाब मुलीच्या कुटुंबाला समजली. त्यामुळे मुलीवर दबाव आणून कुटुंबीयांनी अतुल वायधने याच्याविरूद्ध उरळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. त्यानंतर ३१ डिसेंबर २०२२ रोजी युवकाने मुलीस पळवून पुण्याला नेले.

या प्रकरणातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर युवक मुलीला घेऊन १६ फेब्रुवारीला शिवसेना वसाहतीत राहणा-या मावशीकडे आला होता. २० फेब्रुवारी रोजी मुलीसोबत युवक उरळ पोलीस ठाण्यात हजर होणार होता. परंतु पोलीस ठाण्यात हजर होण्यापूर्वीच दोघांनी विषारी औषध प्राशन केले आणि उरळ येथे आले. प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरच दोघे कोसळल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने सर्वोपचार रूग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान अतुल वायधने याचा मृत्यू झाला. तर मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. याप्रकरणात उरळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Leave a Reply