Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

स्वयंसेवी संस्था हा लोकशाहीचा पाचवा आधारस्तंभ – विजय पुराणिक 

पुणे : “विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचे चार आधारस्तंभ आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्याचबरोबर समाजातील मूलभूत समस्या जाणून घेत, त्यावर सातत्याने काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था या लोकशाहीचा पाचवा आधारस्तंभ आहे”, असे मत राष्ट्रीय सेवा भारती या स्वयंसेवी संस्थांच्या शिखर संघटनेचे संयुक्त महामंत्री विजयराव पुराणिक यांनी व्यक्त केले.

सेवावर्धिनी या सेवाभावी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधत पुण्यात सेवा तरंग या दोन दिवसीय राज्यस्तरीय स्वयंसेवी संस्था परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सेवावर्धिनी, मुकुल माधव फाउंडेशन, पर्सिस्टंट फाउंडेशन आणि प्राज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वानवडी येथील महात्मा फुले संस्कृतिक भवन येथे ही परिषद संपन्न झाली.  परिषदेच्या समारोपाच्या सत्रात पुराणिक यांनी परिषदेत सहभागी झालेल्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. याप्रसंगी सेवावर्धिनी’चे कार्याध्यक्ष किशोर देसाई, कार्यवाह सोमदत्त पटवर्धन उपस्थित होते.
पुराणिक म्हणाले, ” लोकशाहीमध्ये स्वयंसेवी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कोणताही प्रकल्प पूर्ण होण्यासाठी नागरिकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असतो. हा सहभाग घडवून आणण्यासाठी, लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वयंसेवी संस्था अतिशय मोलाची भूमिका निभावतात. त्यामुळेच या संस्था लोकशाहीचा पाचवा आधारस्तंभ आहेत, असे मला वाटते.”  
ते पुढे म्हणाले, ” कोणतेही काम करण्यासाठी कौशल्य हवेच, त्याबरोबरच मूल्यांचा विचार होणेही तितकेच गरजेचे आहे. बरेचदा कौशल्याच्या विचार करताना, मूल्याचा विसर पडतो. एखादी व्यक्ती अतिशय चांगला हिशोब लिहू शकते, पण ती व्यक्ती प्रामाणिकपणे तो हिशोब लिहिल हेही तेवढेच महत्त्वाचे. त्यामुळेच स्वयंसेवी संस्थांनी मूल्याधिष्ठीत कुशल कार्यकर्ता जोडणे अधिक महत्त्वाचे असते. “
आपण जे काम करतो आहोत, ते समाजाच्या हितासाठीच करत आहोत, हे लक्षात घेऊन, अहंकार विरहित, एकत्रित आणि विनम्र वृत्तीने आपण काम केले, तर सेवावर्धिनी च्या सुवर्ण महोत्सवाकडे निश्चितच आपण यशस्वी वाटचाल करू असे मला वाटते. त्यामुळे सर्व संस्थांनी याचा विचार करावा, असे आवाहन देखील पुराणिक यांनी यावेळी केले.
तत्पूर्वी, पुण्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज परिषदेत सहभागी होऊन, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले,” जे काम पूर्वी ऋषी मुनींनी मोठ्या स्तरावर केलं तेच कार्य तुम्ही आपापल्या क्षेत्रात करता आहात. सामाजिक संस्थांना सामजिक बांधिलकीसोबतच आपल्या कामाची मांडणी ही चांगल्याप्रकारे करता आली पाहिजे. त्यादृष्टीने योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध होणे आवश्यक आहे. ते सेवावर्धिनी आपण उपलब्ध करून देते.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading