Wednesday, May 27, 2026
Latest NewsPUNE

भारत बाला यांनी दिला ए आर रहमान यांच्यासोबत चित्रित केलेल्या ‘वंदे मातरम’ च्या आठवणींना उजाळा

पुणे  : कच्छ’च्या वाळवंटात, तळपत्या उन्हात ज्यावेळी आम्ही तिरंगा ध्वज फडकाविला त्यावेळी अक्षरशः शेकडो लोक स्वतः हून पुढे आले आणि अगदी एक रुपयाही न घेता आमच्या गाण्याच्या चित्रीकरणात सहभागी झाले. आम्ही त्यांना अन्य कोणत्याही सोयी दिल्या नव्हत्या, केवळ पिण्यासाठी पाणी दिले होते. तो अतिशय अविस्मरणीय अनुभव होता, अशा शब्दांत प्रसिद्ध चित्रपट निर्माते भारत बाला यांनी संगीतकार ए आर रहमान यांच्या १९९७ साली प्रकाशित झालेल्या आणि अतिशय लोकप्रिय ठरलेल्या ‘ वंदे मातरम् ‘ या गाण्याच्या आठवणींना उजाळा दिला.

असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय), पुणे चॅप्टर तर्फे आयोजित १७ वी ‘पुणे डिझाईन फेस्ट २०२३’ ही डिझाईन विषयक राष्ट्रीय परिषद नगर रस्ता येथील हॉटेल हयात रिजेंसी येथे नुकतीच संपन्न झाली.  ‘नेक्स्ट २५ ‘ अर्थात आगामी २५ वर्षे अशी संकल्पना असलेल्या या परिषदेच्या शेवटच्या सत्रात भारत बाला यांनी ‘ हिस्ट्री ऑफ फ्युचर ‘ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी इडीआय ‘ चे अध्यक्ष ए सुब्रह्मण्यम आणि एडीआय पुणे चॅप्टर’चे प्रमुख ऋग्वेद देशपांडे उपस्थित होते.

मूळचे तामिळनाडू येथील असलेले बाला यांनी ‘ वंदे मातरम् ‘ या गाण्याचे चित्रीकरण केले होते.

त्याबाबत बाला म्हणाले, ” माझ्या वडिलांकडून भारताचे जे समृद्ध वर्णन मी ऐकले होते, ते या गाण्यातून दाखविण्याचा माझा मानस होता.  या  संपूर्ण गाण्याच्या चित्रीकरणासाठी मी आणि माझी पत्नी कानिका हिने १९९७ साली तब्बल २ कोटी रुपये खर्च केले होते. जी त्यावेळी खूप मोठी रक्कम होती. त्याचबरोबर भारतरत्न पं. भीमसेन जोशी आणि इतर अनेक दिग्गजांसोबत राष्ट्रगीत  चित्रित करण्याचा अनुभव देखील अविस्मरणीय होता.”

कार्यक्रमात बाला यांच्या इतर काही कामांबाबत सादरीकरण झाले. बाला हे सद्या ‘व्हर्च्यूअल भारत’ या एका महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करत आहेत. यामध्ये भारतातील विविध समुदायांवरील आतापर्यंत कथन न केलेल्या गोष्टी सांगत असतात. यामध्ये तमिळनाडू येथील दसरा उत्सव ते कोविड १९ मध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत अशा अनेक विषयांचा समावेश आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading