डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रमाईंची साथ अन् त्याग मोलाचा : अंजली कुलकर्णी
रमाई महोत्सवात रंगले रमाईंच्या लेकरांचे कविसंमेलन
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यकतृत्व खूप मोठे आहे. समाज सुधारणेच्या वाटचालीत महामाता रमाई यांची बाबासाहेबांना दिलेली साथ आणि केलेला त्याग खूप मोलाचा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी केले.
महामाता रमाई महोत्सवात महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक व आडकर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रमाईंच्या लेकरांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी कुलकर्णी अध्यपदावरून बोलत होत्या. संमेलनाचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, समन्वयक विठ्ठल गायकवाड, महिला अध्यक्ष लता राजगुरू आदी उपस्थित होते.
कविसंमेलनाची सुरुवात दीपक करंदीकर यांनी सुरेश भट यांच्या ‘भीमवंदना’ या कवितेने केली. कविसंमेलनात बण्डा जोशी, मनोहर सोनवणे, मृणालिनी कानिटकर-जोशी, राजेंद्र वाघ, विद्या कदम, पुरुषोत्तम सदाफुले यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान सोप्या भाषेत आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून अंजली कुलकर्णी यांनी पुस्तकरुपात लिहिले आहे. हे पुस्तक अभ्यासकांसाठीही उपयुक्त ठरत आहे. त्या निमित्त कुलकर्णी यांचा अॅड. प्रमोद आडकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आभार लता राजगुरू यांनी मानले.
