कॅन्सर सर्जन डॉ. शेखर कुलकर्णी यांना ‘दिठी समाजभान पुरस्कार प्रदान
पुणे : कॅन्सर सर्जन व कलावंत डॉ. शेखर कुलकर्णी यांना ‘दिठी समाजभान पुरस्कार २०२३’ देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार देण्यात येतो.
लाॅ कालेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सुमित्रा भावे यांच्या प्रथम स्मृतिदिनी डॉ. शेखर कुलकर्णी यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी दिग्दर्शक सुनील सुकथनकर व सती भावे उपस्थित होते. सुमित्रा भावेंनी दाखवलेल्या दिशेने मार्गक्रमण करीत समाजकार्य व कला या क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्ती वा संस्था यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
सती भावे म्हणाल्या, सुमित्रा भावे यांच्या शेवटच्या ‘दिठी ‘ या चित्रपटाचे नाव दृष्टी या अर्थाने या पुरस्कारास देण्यात आले आहे. कुठल्या एका संस्थेच्या वतीने हा पुरस्कार नसून सर्व रसिक, कलावंत व कार्यकर्ते यांच्या विशाल परिवारातर्फे देण्यात येत आहे.
सुनील सुकथनकर म्हणाले, डॉ. कुलकर्णी यांना स्तन कर्करोग क्षेत्रात व लघुपट निर्मिती, संगीत कार्यक्रम या माध्यमातून केलेल्या सामाजिक कामासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
डॉ. शेखर कुलकर्णी म्हणाले, सुमित्रा भावे यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांच्याकडूनच मला माझ्या कामासाठी प्रोत्साहन मिळाले. त्यांचे समग्र चरित्र लिहिले जावे, असे विचार यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केले.
