पुणे डिझाईन फेस्ट २०२३ मध्ये उलगडणार डिझाईन क्षेत्राचे विविध पैलू
पुणे : असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय), पुणे चॅप्टर या संघटनेतर्फे शुक्रवार,३ फेब्रुवारी आणि शनिवार,४ फेब्रुवारी रोजी १७ व्या ‘पुणे डिझाईन फेस्ट २०२३’ या डिझाईन विषयक राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. नगर रस्ता येथील हॉटेल हयात रिजेन्सी याठिकाणी होणाऱ्या या महोत्सवात डिझाईन क्षेत्राशी निगडीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेतर्फे दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. गेली दोन वर्षे ऑनलाईन स्वरूपात संपन्न झालेला हा महोत्सव यंदा प्रत्यक्ष स्वरूपात होणार असून, ‘नेक्ट २५’ अर्थात डिझाईन क्षेत्रातील आगामी २५ वर्षे अशी महोत्सवाची संकल्पना असून यामध्ये डिझाईन क्षेत्रातील सध्यातील ट्रेंड्स, नवीन तंत्रज्ञान, तरुणाईचा दृष्टीकोन लक्षात घेत, पुढील २५ वर्षामधील डिझाईन क्षेत्राची वाटचाल अशा विविध विषयांवर परिषदेत विचारमंथन होणार आहे अशी माहिती एडीआय, पुणे चॅप्टरचे अध्यक्ष ऋग्वेद देशपांडे यांनी दिली.
महोत्सवात डिझाईन क्षेत्रातील तज्ज्ञ रेड बलून संस्थेचे संस्थापक व कार्यकारी संचालक समर सिंग जोधा हे ‘क्रिएटीव्हीटी वर्सेस इनर व्होइस’ या विषयावर, द हार्ड कॉपी मॅग्झीन’च्या संस्थापिका मीता मल्होत्रा या ‘ऑन पुणे फॉर डिझाईन, बाय डिझाईन’ आणि भारत बाला प्रोडक्टस’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भारत बाला हे ‘ हिस्ट्री ऑफ द फ्युचर’ या विषयांवर प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील. याव्यतिरिक्त अॅमस्टरडॅम येथील थोनिक’च्या प्रतिष्ठीत डीझायनर निक्की गोन्नीसेन, ईस्त्राईल येथील सार्वजनिक वाहतूक प्रकल्पातील तज्ज्ञ केनेथ सिगल, महिला सक्षमीकरण विषयावरील प्रवक्त्या सैरी चहल, भारतातील डिझायनिंग समुपदेशक प्रदीप सिन्हा, अल्ट्राव्हायलेट ओटोमोटीव्ह’चे अनिकेत दास, प्रसिद्ध रंगकर्मी रुपाली भावे हे देखील ‘ड्रामा इन डिझाईन – व्हाट सेट्स यु अपार्ट’, ‘जर्नी अनप्लान्ड’, ‘इनेबल, इम्पोवर, एक्झीक्युट’ अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
डिझाईन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा पुणे डिझाईन फेस्ट या परिषदेत विशेष सत्कार केला जाईल. यामध्ये कीर्ती त्रिवेदी यांना डिझाईन एज्युकेशन’मधील उल्लेखनीय कामगिरीसाठी, प्रदीप सिन्हा यांना डिझाईन आंत्रप्रेन्युअरशिप’मधील उल्लेखनीय कामगिरीसाठी तर मला सिन्हा यांना टेक्स्टाइल डिझायनिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सन्मानित केले जाणार आहे.
डिझाईन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने महोत्सवांतर्गत दरवर्षी डिझाईन अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ‘बॅटल ऑफ डिझाईन’ हा उपक्रम आयोजित केला जातो. यांतर्गत विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकल्प सादर करण्याची संधी दिली जाते. यंदा या उपक्रमासाठी भारतभरातून तब्बल ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. यापैकी सर्वोत्तम ३० प्रकल्पाची विविध श्रेणीमध्ये निवड करत, त्यांना गौरविण्यात येणार आहे.
त्याचबरोबर असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया, पुणे चॅप्टर या संघटनेच्या सदस्य संस्थांतर्फे महोत्सव कालावधीत त्यांचे पुण्यातील डिझाईन स्टुडीओ हे डिझाईन या विषयात रुची असणाऱ्या व्यक्तींसाठी आणि या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी खुले ठेवले जाणार आहेत. नागरिक या ठिकाणी भेट देण्याबरोबरच तेथे आयोजित कार्यशाळेत विनामूल्य सहभागी होऊ शकतील हे विशेष.
असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया संघटनेबाबत : एडीआय ही संघटना देशातील डिझाईन क्षेत्रासाठी काम करणारी राष्ट्रीय स्तरावरील संघटना असून, पुण्यासहित भारतभरात या संघटनेच्या १० प्रादेशिक आणि १० विद्यार्थी शाखा आहेत. डिझाईन डिझाइन व्यावसायिक, वापरकर्ते, उद्योजक, शिक्षण संस्था आणि धोरण निर्माते यांच्यात एक मध्यस्थ म्हणून ही संघटना कार्यरत असून, भारतीय डिझाईन क्षेत्राच्या वृद्धीसाठी आवश्यक धोरण निर्मितीमध्ये संस्थेचे सक्रिय योगदान असते. डिझायनिंग’शी निगडीत देशभरातील अनेक संस्था या संघटनेच्या सदस्य असून, डिझाईन क्षेत्रातील उत्तम पद्धतींची देवाण-घेवाण करण्याच्या अनुषंगाने संघटनेतर्फे दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन केले जातात.
