PMP – हडपसर डेपोतील वाहक व चालक यांनी एका शिफ्टमध्ये आणले विक्रमी उत्पन्न
पुणे : पीएमपीएमएल च्या हडपसर डेपोचे वाहक राजू चिंतामण पराते व चालक प्रदीप सुतार यांनी एका शिफ्टमध्ये
तिकीट विक्रीतून विक्रमी २२,५३५/- रूपये इतके उत्पन्न आणले. वाहक राजू पराते व चालक प्रदीप सुतार यांनी रविवार,
दि. २९ जानेवारी २०२३ रोजी हडपसर ते जेजुरी या मार्गावर विक्रमी उत्पन्न आणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पीएमपीएमएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया, सहव्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा
पोतदार-पवार यांनी वाहक राजू पराते व चालक प्रदीप सुतार यांनी तिकीट विक्रीतून आणलेल्या विक्रमी उत्पन्नाबद्दल
त्यांचे विशेष अभिनंदन केले.
वाहक राजू पराते (बदली वाहक क्र.५५६७) व चालक प्रदीप सुतार (बदली चालक क्र.४६७९) हे रविवार, दि. २९ जानेवारी २०२३ रोजी जादा शेड्युलसाठी ड्युटीस होते, हडपसर ते जेजुरी या मार्गावर (सकाळपाळीच्या) एका शिफ्टमध्ये
तिकीट विक्रीतून त्यांनी विक्रमी २२,५३५/- रूपये इतके उत्पन्न परिवहन महामंडळास मिळवून दिले.
रविवार, दि. २९ जानेवारी २०२३ रोजी हडपसर ते जेजुरी मार्गावर पीएमपीएमएल च्या एकूण ६ बस धावत होत्या.
यामध्ये १ बस नियमित शेड्युलची व ५ बसेस जादा सोडण्यात आल्या होत्या. या ६ बसेसपैकी एका बसवर राजू पराते वाहक तर प्रदीप सुतार चालक म्हणून काम करीत होते.त्यांनी त्यांच्या शिफ्टमध्ये बसच्या तिन फेऱ्या केल्या. त्यात त्यांनी २२,५३५/- रुपये इतके विक्रमी उत्पन्न तिकीट विक्रीतून जमा केले. हडपसर ते जेजुरी मार्गावर रविवारी गर्दी असल्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांना घेऊन जाण्याचा प्रयत्न वाहक पराते व चालक सुतार यांनी केला. त्यामुळेच विक्रमी उत्पन्न आणण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.
