Budget 2023 -24 : बांधकाम क्षेत्रास अप्रत्यक्ष लाभ
पुणे : केंद्रीय अर्थसंकल्प २०२३- 24 आज जाहीर झाला. बांधकाम क्षेत्राच्या या अर्थसंकल्पा कडून खूप अपेक्षा होत्या मात्र, बांधकाम क्षेत्रासाठी यामध्ये थेट अशी कोणतीच तरतूद करण्यात आलेली नाही. पण नागरिकांना होणारा आर्थिक लाभ लक्षात घेत, बांधकाम क्षेत्रालाही त्याचा सकारात्मक फायदा होईल, रोजगार निर्मितीला चालना मिळेल, गृह खरेदीवर सकारात्मक परिणाम होईल, अशा भावना बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांनी व्यक्त केल्या आहेत.
रोजगार निर्मितीला चालना मिळेल – सतीश मगर, चेअरमन , क्रेडाई नॅशनल
पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या निधीमुळे देशाचा एकूण विकास होण्यास निश्चितच मदत होईल. याद्वारे रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्यामुळे नागरिकांमध्ये एक सकारात्मक वातावरण तयार होईल. त्याचबरोबर उत्पन्नावरील करामध्ये देण्यात आलेल्या सूटमुळे मध्यमवर्गीय नागरिकांच्या आर्थिक क्षमतेत वाढ होईल. याचा गृह खरेदीवर सकारात्मक परिणाम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, कारण कोविड -१९ नंतर घरांच्या खरेदीचे महत्व वाढले असून, घरखरेदीला नागरिक अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय नागरिकांना देण्यात आलेल्या सवलतीमुळे बांधकाम क्षेत्राला देखील अप्रत्यक्ष स्वरूपात फायदा होणार आहे. एकूणच हा अर्थसंकल्प आमच्यासाठी चांगला आहे, असे आम्ही मानतो.
गृह खरेदीच्या प्रमाणात वाढ होईल – अनिल फरांदे, अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो
अर्थसंकल्पात बांधकाम क्षेत्राला थेट फायदा मिळालेला नाही, मात्र लोकांची आर्थिक क्षमता वाढणार असल्यामुळे गृह खरेदीच्या प्रमाणात वाढ होईल, असे आम्हाला वाटते. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात सध्या असलेली वृद्धी यापुढेही कायम राहील अशी आमची अपेक्षा आहे.
बांधकाम क्षेत्राला सकारात्मक फायदा होईल – रणजित नाईकनवरे , उपाध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो
प्रामुख्याने मध्यमवर्गीयांसाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात बऱ्याच सवलती देण्यात आल्या आहेत. विशेषतः करामध्ये मध्यमवर्गीयांसाठी देण्यात आलेल्या सवलतीमुळे मध्यमवर्गीय नागरिकांची क्रयशक्ती वाढून, ते अधिक चांगल्या प्रकारे गृहकर्जाची परतफेड करू शकतील, त्यामुळे नागरिक कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहित होतील. पर्यायाने बांधकाम क्षेत्राला, निश्चितच याचा लाभ होईल. अर्थसंकल्पात आयात शुल्क काही प्रमाणात कमी करण्यात आले आहे. यामुळे परदेशातून आयात होणाऱ्या स्टील’चे दर कमी होण्याची शक्यता वाटते. असे झाल्यास, कदाचित बांधकाम क्षेत्रातील महागाई दर कमी होईल, असे आम्हाला वाटते. कौशल्य विकासासाठी चालना देण्याचा उल्लेख अर्थसंकल्पात करण्यात आला आहे, याचा बांधकाम क्षेत्रासदेखील उपयोग होईल. या क्षेत्रासाठी आवश्यक असलेले कौशल्य गुण विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यास यामुळे हातभार लागेल. ‘अर्बन प्लानिंग’साठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. बांधकाम क्षेत्रासाठी क्रेडाई संस्थेतर्फे देण्यात आलेल्या शिफारशींचा उल्लेख अर्थसंकल्पात नसला, तरी नागरिकांना होणारा आर्थिक लाभ लक्षात घेत, बांधकाम क्षेत्रालाही त्याचा सकारात्मक फायदा होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. एकूणच यंदाचा अर्थसंकल्प हा उत्तम अर्थसंकल्प असून, या अर्थसंकल्पाला १० पैकी ७ गुण दिल्यास ते वावगे ठरणार नाही.
बांधकाम क्षेत्रास अप्रत्यक्ष लाभ – अरविंद जैन, सचिव, क्रेडाई पुणे मेट्रो
केंद्रीय अर्थसंकल्पासाठी क्रेडाई पुणे मेट्रो या संघटनेतर्फे गृहकर्जाच्या व्याजादरावर देण्यात येणाऱ्या 2 लाख रुपयांच्या सुटीची मर्यादा वाढविणे, परवडणाऱ्या घरांसाठी मूल्य ही मर्यादा न ठेवता चटई क्षेत्रावर परवडणाऱ्या घरांची व्याख्या व्हावी, रु.२० लाखपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या घरमालकांना भाडेतत्वावरील उत्पन्नात १०० % सूट देऊन प्रोत्साहन द्यावे. तसेच भांडवली मालमत्तेवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील कराचा दर २०% वरून १०% आणि मालमत्तेचा मालकी कालावधी १२ महिन्यांपर्यंत कमी केला करावा, अशा चार महत्वपूर्ण शिफारशी करण्यात आल्या होत्या. मात्र त्याबाबात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच आयकरात ‘कॅपिटल गेन’ वरील मर्यादा १० कोटी इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या शहरातील मालमत्ता धारकांना याचा कदाचित फटका बसू शकतो. मात्र याबाबत अजून स्पष्टता नाही. याचा आणखी अभ्यास करण्याची गरज आहे. मात्र बांधकाम क्षेत्रास थेट लाभ जाहीर झाला नसला, तरी पायाभूत सुविधा आणि कर मर्यादेतील सूट यामुळे बांधकाम क्षेत्रास अप्रत्यक्ष लाभ होईल, असे आम्हाला वाटते.
बांधकाम क्षेत्राला थेट असे काहीच मिळाले नाही- विशाल गोखले, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, गोखले कन्स्ट्रक्शन्स
कोरोना काळानंतर सावरत असलेल्या बांधकाम क्षेत्राला यंदाच्या अर्थसंकल्पात बऱ्याच अपेक्षा होत्या परंतु बांधकाम क्षेत्राला थेट असे काहीच मिळाले नाही. बजेटमध्ये पायाभूत सोयीसुविधांच्या विकासावर असलेला भर, अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या अन्य काही बाबी अप्रत्यक्षरित्या बांधकाम क्षेत्राला फायदेशीर ठरतील अशी अपेक्षा करूयात. प्रधानमंत्री आवास योजनेला दिलेला वाढीव निधी नक्कीच स्वागतार्ह आहे.
बांधकाम क्षेत्राला निश्चितच या अर्थसंकल्पांचा फायदा होईल – कपिल गांधी, व्यवस्थापकीय संचालक, सिग्मा वन युनिव्हर्सल
वैयक्तिक स्वरूपात मला हा अतिशय उत्तम अर्थसंकल्प वाटतो. कारण अर्थसंकल्पात तरुण, महिला आणि स्टार्ट अप यांच्या सक्षमीकरणावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच मध्यमवर्गीय नागरिकांसाठी यामध्ये अधिक सवलती देण्यात आल्या आहेत. बांधकाम क्षेत्र हे भावनाधारित क्षेत्र आहे. अर्थसंकल्पात कमी आणि मध्यम उत्पन्न गटासाठी देण्यात आलेल्या सवलतींमुळे त्यांच्यामध्ये एक सकारात्मक भावना निर्माण होण्यास मदत मिळेल, कारण त्यांना होणारा आर्थिक लाभ अधिक असेल. त्यामुळे गृह खरेदी आणि एकूनच बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी ते प्रोत्साहित होतील. त्याचबरोबर पायाभूत सुविधांच्या विकास, हवाई उड्डाण यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या तरतुदींमुळे टायर ३ आणि टायर ४ शहरे विकसित होण्यास चालना मिळेल, ही शहरे टायर १ शहरांसोबत ते अधिक चांगल्या प्रकारे जोडले जातील. यातून त्या शहरांमध्ये देखील बांधकाम क्षेत्रातील गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे भावानाधारित या बांधकाम क्षेत्राला निश्चितच या सर्व गोष्टींचा फायदा होईल, अशी मला अपेक्षा आहे.
या अर्थसंकल्पात आर्थिक शिस्त आणि भविष्यातील गरजांच्या अनुषंगाने देशाला सज्ज करण्याच्या दृष्टीने सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. पायाभूत सुविधांना देण्यात आलेले प्राधान्य हे पर्यायाने बांधकाम क्षेत्रासाठी देखील उपयुक्त ठरणार आहे. विशेषत: टायर २ आणि ३ स्वरूपातील शहरांमध्ये याचा अधिक प्रभाव होईल. रोजगार निर्मिती, तरुणांमध्ये कौशल्य विकास, कृषी उत्पादकता, आणि थेट करातील सवलत याचा गृह खरेदी आणि एकूणच बांधकाम क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होईल. सरकारच्या धोरणांमुळे भविष्यात बांधकाम क्षेत्रात स्थानिक आणि परकीय गुंतवणूकित वाढ होईल. एकूणच हा एक संयमित, आर्थिकदृष्ट्या प्रभावी असा अर्थसंकल्प आहे.अर्थसंकल्पात सर्वंकष विकासावर भर – विनित देव, अर्थ तज्ज्ञ आणि पॉझिव्ह्यू ग्रुप’चे अध्यक्ष
अर्थसंकल्पात कर स्लब’मध्ये देण्यात आलेल्या सवलतींचा सकारात्मक परिणाम नागरिकांवर होईल. त्यामुळे गृह खरेदीमध्ये गुंतवणूक करण्यास ते प्रोत्साहित होतील. या अर्थसंकल्पात सर्वंकष विकासावर भर देण्यात आला असल्याने, ही एक आनंददायी बाब ठरत आहे. पायाभूत सुविधांचा विकास, विमानसेवांचा विकास यामुळे गुंतवणूकीला अधिक बळ मिळेल.