Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

पं रोणू मुजुमदार यांच्या सुमधुर बासरीवादनाने श्रद्धा सुमन कार्यक्रमाचा समारोप

पुणे : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पं. रोणू मुजुमदार यांच्या सुमधुर बासरीवादनाने ‘श्रद्धा सुमन’ या तीन दिवसीय सांगीतिक कार्यक्रमाचा समारोप झाला. आपले गुरु पं. किशन महाराज यांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने मागील २८ वर्षे दरवर्षी त्यांचे शिष्य व सुप्रसिद्ध तबलावादक पं. अरविंद कुमार आझाद हे पुण्यात ‘श्रद्धा सुमन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. सदर वर्ष हे पं. किशन महाराज यांचे जन्मशताब्दी वर्ष असून, त्यानिमित्ताने वर्षभर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

सप्टेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या या कार्यक्रम श्रुखंलेतील पाचवा कार्यक्रम असून सदर तीन दिवसीय विशेष सांगीतिक कार्यक्रम राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या विशेष सहकार्याने आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या सहाय्यक संचालिका सुनीता आसवले उपस्थित होत्या.

पं रोणू मुजुमदार यांनी राग अभोगी कानडाने आपल्या वादनाला सुरवात केली. त्यात त्यांनी झपतालमध्ये पारंपरिक बंदिश, तिहाई, ताना तीनताल यांचे सादरीकरण केले. ‘अब कैसे बने मोरी बात सजनी…’ या त्यांनी सादर केलेल्या बंदिशीला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बनारस अंदाजातील भैरवीने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा व ‘श्रद्धा सुमन’ या तीन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप केला.

गुरू हा शब्द नाही तर एक तत्व आहे, भाव आहे, ज्ञानाचा सागर आहे असे सांगत पंडित रोणू मुजुमदार म्हणाले, “पंडित अरविंद कुमार आझाद यांनी उभारलेल्या महायज्ञात आम्ही देत असलेली ही आहुती आमची पंडित किशन महाराज यांप्रती असलेली निष्ठा आहे. मी भाग्यशाली आहे कारण मला मोठ्या प्रमाणात त्यांचा सहवास लाभला, त्यांच्या सोबत कार्यक्रम करण्याचे भाग्य लाभले. आम्हा सर्व कलाकारांना त्यांच्याकडून खूप काही शिकता आले. लय, ताल यांमध्ये श्वास घेण्याची कला आम्हाला त्यांनीच शिकवली.”

त्यांना कल्पेश सांचल (बासरी), संदीपन मुखर्जी (तबला) यांनी समर्पक साथसंगत केली. डॉ. सुनील देवधर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading