Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

ए.पी.जे. अब्दुल कलाम खऱ्या अर्थाने ‘पिपल्स प्रेसिडेंट’ : डॉ. रघुनाथ माशेलकर

पुणे : वेगवेगळ्या खिडक्यांमधून पाहताना जग वेगवेगळे दिसते; पण सगळ्या खिडक्यातून पाहिल्यानंतर एखाद्या व्यक्तिमत्वाची पूर्णपणे ओळख होते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे अतिशय संवेदशील, सहृदय, शालीन, विनम्र असे व्यक्तिमत्व होते. लहान मुलांविषयी त्यांना विशेष कौतुक होते, युवकांमध्ये त्यांची लोकप्रियता होती, ते खऱ्या अर्थाने ‘पिपल्स प्रेसिडेंट’ होते, असे गौरवोद्गार पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी काढले. प्राचार्य डॉ. छाया महाजन यांनी डॉ. कलाम यांच्याविषयी पुस्तक लिहून मोठे समाजकार्य केले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून मिळणारी प्रेरणा भावी पिढीला उपयुक्त आहे. त्यामुळे लेखिकेचे फक्त अभिनंदनच नाही तर समाजातर्फे आभार मानतो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.


मराठी वाङ्मय क्षेत्रातील ख्यातनाम लेखिका, मराठवाडा लेखिका संमेलनाच्या माजी अध्यक्षा, माजी प्राचार्य डॉ. छाया महाजन यांच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन डॉ. माशेलकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. साकेत प्रकाशनचे साकेत भांड व्यासपीठावर होते.
आपण कधी, कुठे, कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसते; परंतु आयुष्यात पुढे कोण व्हायचे हे मात्र आपल्या हातात नक्की असते, असे नमूद करून डॉ. माशेलकर म्हणाले, डॉ. छाया महाजन यांनी अनेक प्रकारच्या साहित्यकृतींची निर्मिती केली आहे. हे पुस्तक आवडल्याने मी पुस्तकाची प्रस्तावना आनंदाने लिहिली आहे. हे पुस्तक वाचायला हाती घेतले की खाली ठेवावेसे वाटत नाही अशी त्यांनी लेखनातून मांडणी केली आहे.

 प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, लेखिकेचा साहित्य क्षेत्रातील प्रवास विलक्षण आहे. त्यांनी विविध विषयांवर लिखाण केले आहे. अनेकदा चाकोरीबाहेरचा विचारही त्यांनी आपल्या लेखनातून वाचकांपर्यंत पोहोचविला आहे. मराठी साहित्य विश्वाला न मानविणारा विषयही डॉ. महाजन यांनी संयमित आणि समर्थपणे हाताळला आहे. त्यांच्या लिखाणावर कोणत्याही विचारधारेचा पगडा दिसून येत नाही. लेखिकेच्या अनुवादित साहित्यकृतीत स्वाभाविकता जाणवते. काळवंडलेली मने प्रज्वलित करणाऱ्या राष्ट्रपतींविषयी सकारात्मक विचारांचा जागर करणारे लिखाण लेखिकेने या पुस्तकाच्याद्वारे केले आहे. डॉ. कलाम यांच्या चरित्रचिंतनाबरोबरच त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञानही या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर येते. हिमालयासारखी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे जनसामन्यांसमोर आणणे हे लेखकाचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी सूचित केले.

 प्राचार्य डॉ. छाया महाजन म्हणाल्या, समीक्षकांनी साहित्याची दखल घेतली नाही तरी मला समीक्षकापेक्षा वाचक आणि प्रकाशक महत्त्वाचा वाटतो. वांचकांनी साहित्यकृती स्वीकारल्यामुळे चाळीस पुस्तकांच्या लेखनापर्यंत प्रवास करता आला आहे. कोणासारखे दिसावे, असावे, लिहावे यात अडकायचे नाही हे मनात पक्के ठरवून लेखन प्रवास केल्याने सर्जनशीलतेला वाव मिळून माझ्या हातून सहजतेने ल{खाण घडले. स्त्रीने स्त्रीविषयी, स्त्रीसाठीच लिहिले पाहिजे हा स्त्री-पुरूष भेदाभेद मला अमान्य आहे. स्त्री आणि पुरूष हे दोघेही माणूसच आहेत त्यामुळे लेखक म्हणून भेदाभेद असू नये ही आपली स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी सांगीतले.
मान्यवरांचे स्वागत डॉ. चेतन महाजन, डॉ. अमित महाजन, प्रतिमा भांड, गौरी महाजन, ज्योती नांदेडकर यांनी केले. प्रकाशकीय प्रास्ताविक प्रतिमा भांड यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन वि. दा. पिंगळे यांनी केले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading