Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

श्रद्धा सुमनच्या तिसऱ्या दिवशी रंगले विशाल कृष्ण यांचे कथकनृत्य व पं रघुनंदन पणशीकर यांचे गायन

पुणे  : ‘श्रद्धा सुमन’ या कार्यक्रमाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी प्रसिद्ध कथक नृत्यांगना राणी सितारा देवी यांचे नातू व बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध कथक नर्तक विशाल कृष्ण यांचे कथक नृत्य व गानसम्राज्ञी पद्मविभूषण किशोरी अमोणकर यांचे शिष्य व जयपूर – अत्रौली घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर यांचे गायन रंगले. आपले गुरु पं. किशन महाराज यांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने मागील २८ वर्षे दरवर्षी त्यांचे शिष्य व प्रसिद्ध तबलावादक पं. अरविंद कुमार आझाद हे पुण्यात ‘श्रद्धा सुमन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. सदर वर्ष हे पं. किशन महाराज यांचे जन्मशताब्दी वर्ष असून, त्यानिमित्ताने वर्षभर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

सप्टेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या या कार्यक्रम श्रुखंलेतील हा पाचवा कार्यक्रम असून सदर तीन दिवसीय विशेष सांगीतिक कार्यक्रम राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या विशेष सहकार्याने आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या सहाय्यक संचालिका सुनीता आसवले उपस्थित होत्या.

विशाल कृष्ण यांनी आपल्या आजी व प्रसिद्ध कथक नृत्यांगना राणी सितारा देवी यांच्याकडून नृत्याचे प्रशिक्षण घेतले असून आपल्या परिवारातील ते ११ व्या पिढीचे कलाकार आहे. आजच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात विशाल यांनी बनारस घराण्याच्या पारंपरिक गणेश वंदनेने केली. यांनतर त्यांनी तीन तालातील पारंपरिक बंदिशी प्रस्तुत केल्या. लय, सूर, ताल व नर्तन याचा सुरेख अनुभव या निमित्ताने पुणेकरांना घेता आला. यानंतर विशाल कृष्ण यांनी गत निकास याचे पाच प्रकार सादर केले. कृष्ण व राधा यांवरील गत प्रस्तुती व ‘आज खेलेंगे होली…’ या होरीने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

आपल्या घराण्यातील दादराक्वीन अलखनंदा देवी यांपासून ओळखल्या जाणाऱ्या थाळीवरील ततकार सादरीकारणाने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना सोमनाथ मिश्रा (गायन), दीपक भानुसे (बासरी) आणीन नितीश पुरोहित (सरोद) यांनी साथसंगत केली.

यानंतर प्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर यांचे गायन झाले. त्यांनी राग भूपने आपल्या गायनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी ‘येरी आज …’ ही रचना प्रस्तुत केली. आपल्या गुरू गानसम्राज्ञी पद्मविभूषण किशोरी अमोणकर यांनी अजरामर केलेली ‘सहेला रे…’ या प्रस्तीतीने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. ‘मान रे मान रे पियां मोरी…’ ही राग बसंत बहार मधील बंदिश सादर करीत त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना सौरभ गुळवणी (तबला), अमेय बिच्छु (संवादिनी), सौरभ कडगांवकर (गायन), शुभम खंडाळकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. डॉ. सुनील देवधर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading