Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

बालसुधारगृहातून आठ बालकांचे पलायन

पुणे : येरवडा येथील बाल सुधारगृहामधून आठ विधी संघर्ष ग्रस्त बालकांनी दिवसा पलायन केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. या विधी संघर्ष ग्रस्त बालकांमध्ये पुणे, पिंपरी, लोणावळा, सातारा, सांगली तसेच परिसरातील बालकांचा समावेश आहे. त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समजते. गंभीर बाब म्हणजे बालसुधारगृहाच्या आवारातून शिडी लावून ही मुले सकाळी पळून गेली आहेत.

दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महिला व बालविकास आयुक्तालयाच्या वतीने संबंधित घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आयुक्त राहुल मोरे यांनी दिली. या प्रकरणाची पुणे पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी बाल सुधारगृह येथे भेट देऊन पाहणी केली.याप्रकरणी आठ विधी संघर्ष ग्रस्त बालकांनी पलायन केल्याची नोंद येरवडा पोलिसांकडे करण्यात आली आहे. पुणे शहरात वाढती गुन्हेगारी व त्यामधील बाल गुन्हेगारांचे वाढते प्रमाण यामध्येच विधी संघर्षग्रस्त बालकांनी बाल सुधारग्रहातून केलेले पलायन ही धक्कादायक बाब आहे. सध्या शहरातील पोलीस विविध बंदोबस्त व इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन तक्रारी सह शहरातील कायदा व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे.

स्थानिक पातळीवर नागरिकांना पोलीस मदत वेळच उपलब्ध होत नसल्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढत असल्याचे नागरिकांचे मत आहे. अपुरे मनुष्यबळ व इतर अनेक अडचणींमध्ये पोलीस व्यस्त असून सामान्य नागरिक मात्र गुन्हेगारी व इतर अडचणीमुळे त्रस्त झालेले आहेत. या गंभीर समस्येवर पोलीस आयुक्त तातडीने काही ठोस उपायोजना करणार का ?असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. एकंदरीतच आठ विधी संघर्ष ग्रस्त बालकांनी दिवसाढवळ्या बालसुधाग्रहातून पलायन करणे ही बाब गंभीर असून या बालकांकडून गुन्हे होण्याची देखील शक्यता न करता येत नाही. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेणे गरजेचे आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांसह गुन्हे शाखा व संबंधित स्थानिक पोलीस यांना माहिती देण्यात आली असून पलायन केलेल्या विधी संघर्षग्रस्त बालकांचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading